'मूसेवाला आमच्या विरोधी गॅंगमध्ये होता, गाण्यातून शस्त्र दाखवून चॅलेंज करत होता'; लॉरेन्स बिश्नोईचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 11:24 AM2022-06-17T11:24:46+5:302022-06-17T11:39:17+5:30

Sidhu Moose Wala Murder Case : सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या 2 महिन्यांआधीपर्यंत तुरूंगात कैद लॉरेन्सचं (Lawrence Bishnoi) कॅनडात बसलेल्या गोल्डी बराडसोबत बोलणं सुरू होतं.

पंजाबी गायक शुभदीप सिंह उर्फ सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत. मूसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाइंड गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईने पोलिसांना सांगितलं की, सिद्धू हा त्याच्या विरोधी गॅंगसोबत जुळला होता इतकंच नाही तर तो आपल्या गाण्यांमधून आणि गाण्यात रायफल किंवा पिस्तुली वापरून आम्हाला चॅलेंज करत होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई तिहार तुरूंगात फोनचा वापर करत होता. तुरूंगातून फोनच्या माध्यमातून तो गोल्डीसोबत बोलत होता की, कुणाला धमकी द्यायची आहे, कुणाकडून खंडणी वसूल करायची आहे आणि कुणावर गोळी झाडायची आहे. हे सगळं तो फोनवर ठरवत होता.

सिद्धू मूसेवालाच्या हत्येच्या 2 महिन्यांआधीपर्यंत तुरूंगात कैद लॉरेन्सचं कॅनडात बसलेल्या गोल्डी बराडसोबत बोलणं सुरू होतं. पंजाबमधील सर्वात मोठ्या गॅंगस्टरपैकी एक आणि पंजाबचा ड्रग माफिया जग्गू भगवानपुरिया सुद्धा तिहार तुरूंगात लॉरेन्ससोबत बंद होता.

भगवानपुरियाला नुकतंच तुरूंगातून दिल्ल्ली पोलिसांनी कस्टडीमध्ये घेतलं होतं. चौकशी दरम्यान त्याने खुलासा केला की, 22 फेब्रुवारीपर्यंत तो लॉरेन्ससोबत तुरूंगात कैद होता. इथे सतत कॅनडात बसलेल्या गोल्डीचा फोन लॉरेन्स आणि मला येत होता. जग्गूने सांगितलं की, मला आणि लॉरेन्सला वेगवेगळ्या बॅरेकमध्ये बंद केलं होतं.

जग्गू भगवानपुरियाने खुलासा केला की, गोल्डीने एकदा पाकिस्तानातून माझ्यासाठी 50 पिस्तुल मागवले होते. जे शूटर्सना द्यायचे होते. पण ही पिस्तुलं पोलिसांनी पकडली. गोल्डीच हत्यार सप्लाय करत होता. तुरूंगात सतत फोनचा वापर करत असल्याचं समजल्यावर लॉरेन्स बिश्नोईला मार्च 2022 मध्ये जेल नंबर 8 मध्ये शिफ्ट केलं होतं.

सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी लॉरेन्सने असं प्लानिंग केलं जे एखाद्या सिनेमाच्या स्क्रीप्टपेक्षा जराही कमी नव्हतं. इतकंच नाही तर प्लानिंग असं होतं की, कोणतीही एजन्सी पकडू शकणार नाही.

लॉरेन्स कॅनडात बसलेल्या गोल्डी बराडच्या मदतीने आपला भाऊ अनमोलला यूरोपमध्ये शिफ्ट केलं. भाऊ आणि भाच्याला भारतातून फरार करण्याचा उद्देश हा होता की, सिद्धूच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करू नये. यानंतर लॉरेन्स आणि गोल्डीने सिद्धूला मारण्याचा प्लान केला.

लॉरेन्सने दिल्ली पोलिसांच्या चौकशीत खुलासा केला होता की, 7 ऑगस्ट 2021 ला झालेल्या विक्की मिद्दुखेडाच्या हत्येनंतर सिद्धू मूसेवालाच्या हत्येसाठी रेकी केली जात होती. पण सिद्धू आजूबाजूच्या सुरक्षेमुळे अनेकदा वाचला.

एकदा असाही प्लान करण्यात आला होता की, सिद्धूला घरात घुसून मारलं जावं. पण तेही फेल झालं. नंतर सरकारी सुरक्षा कमी केल्याच्या दुसऱ्या दिवशीच 29 मे रोजी सिद्धू मूसेवालाची हत्या करण्यात आली.