“जेथून आला त्याला तिथेच पाठवला”; ८ महिन्याच्या मुलासोबत आईनं जे केलं ते ऐकून संताप येईल By प्रविण मरगळे | Published: January 18, 2021 05:10 PM 2021-01-18T17:10:27+5:30 2021-01-18T17:14:30+5:30
मध्य प्रदेशातील राजधानी भोपाळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी जे घडलंय ते ऐकून तुमचाही संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही, आईच्या नावाला काळिमा फासणारी ही घटना पाहून सर्वांचाच राग अनावर होईल.
भोपाळच्या अशोक नगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने स्वत:च्या ८ महिन्याच्या मुलाला कुऱ्हाडीनं घाव घालून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत आरोपी महिलेला अटक केली आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
माहितीनुसार, भोपाळच्या अशोक नगर भागात राहणाऱ्या रश्मी लोढी यांनी स्वत:च्या ८ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने वार करून त्याला ठार केले. या महिलेने कुऱ्हाडीने चिमुकल्यावर अनेक वार केले, ज्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी आरोपी रश्मी लोढी हिला अटक केली आहे. १६ जानेवारी रोजी रश्मीने तिच्या मुलांसह घर सोडलं होतं, काही तासानंतर ती परतली तेव्हा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पाहून नातेवाईकांना धक्का बसला
यावेळी नातेवाईकांना रश्मीला जाब विचारला तेव्हा ती म्हणाली की, तो एक बकरा होता, मी त्याला त्याच ठिकाणी पाठवले जिथून तो आला होता, रश्मीच्या या उत्तराने नातेवाईकांमध्ये खळबळ माजली.
पोलिसांच्या दाव्यानुसार, सुरूवातीला नातेवाईकांनी हे प्रकरण दडपण्याचा खूप प्रयत्न केला. रश्मीची आई मुलाचा मृतदेह एका कपड्यात घेऊन रुग्णालयात गेली, त्यावेळी पायऱ्या चढत असताना चिमुकल्याचा मृतदेह खाली पडला तेव्हा उपस्थित नागरिकांना याची माहिती झाली.
यानंतर १७ जानेवारीला रश्मीच्या वडिलांनी सकाळी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीदरम्यान हत्येत वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करून आरोपी महिलेला तात्काळ अटक केली आहे.
पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे, प्राथमिक तपासात आरोपी महिलेने चिमुकल्याला रस्त्यावर ठेवले होते, त्यानंतर त्याच्या मानेवर कुऱ्हाडीने हल्ला केला.
रश्मी मानसिक रूग्ण असल्याचं पोलीस तपासात माहिती पडलं आहे, परंतु हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याने पोलिसांकडून विविध अँगलने तपास केला जात आहे.
सध्या आरोपी महिलेला मानसिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, तर स्थानिकांच्या मते, रश्मीने स्वत:च्या मुलाचा बळी दिला असल्याचीही चर्चा आहे.