Sachin Vaze: सचिन वाझे अडकले, CCTV फुटेजमध्ये दिसणाऱ्या ‘त्या’व्यक्तीचा शोध लावण्यात NIA ला मोठं यश By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 02:20 PM 2021-03-17T14:20:09+5:30 2021-03-17T14:23:26+5:30
Mukesh Ambani Bomb Scare: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, यानंतर या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती पीपीई किट्स घालून जात असल्याचं दिसत होतं, परंतु हे पीपीई किट्स नव्हतं तर कुर्ता घातलेला व्यक्ती होता, हा व्यक्ती कोण याचा खुलासा NIA ने केला आहे. मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, या प्रकरणाचा तपास NIA करत आहेत, यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे, यावेळी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
अंबानी यांच्या घराबाहेर जे सीसीटीव्ही फुटेज सापडलं होतं, त्यात एक व्यक्ती संशयास्पदरित्या पीपीई किट्स घालून जात असल्याचं दिसत होतं, परंतु NIA च्या तपासात ही व्यक्ती पीपीई किट्स नव्हे तर पांढऱ्या रंगाचा मोठा कुर्ता आणि डोक्यावर रुमाल घेतल्याचं समोर आलं
आणि ही व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून सचिन वाझेच असल्याचा खुलासा NIA ने केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे. NIA ने म्हटलंय की, CCTV फुटेजमध्ये सचिन वाझे मोठ्या रुमालाने स्वत:चं डोकं लपवत जाताना दिसतात, कारण त्यांना कोणी ओळखू नये,
त्याचसोबत बॉडी लॅग्वेंज आणि चेहरा लपवण्यासाठी त्यांनी मोठ्या आकाराचा कुर्ता-पायजमा घातला होता, पीपीई किट्स नाही असं त्यांनी सांगितले आहे. तसेच सचिन वाझे यांच्या कार्यालयात NIA ने छापा टाकला होता, त्यात लॅपटॉप जप्त केला, त्यातील डेटा आधीच डीलिट करण्यात आला होता
सचिन वाझेंकडे जेव्हा फोनची विचारणा केली तेव्हा मोबाईल कुठेतरी गडबडीत ठेवल्याचं वाझे म्हणाले, परंतु खऱ्या अर्थानं जाणूनबुजून सचिन वाझेंनी त्यांचा फोन फेकून दिला असल्याचं NIA ने म्हटलं आहे.
दरम्यान, एनआयएच्या (NIA) पथकाने एक इनोव्हा गाडी जप्त केली आहे. ती इनोव्हा गाडी आपणच चालवत होतो, अशी कबुली याप्रकरणातील आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात २५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा गाडी आढळून आली होती.
ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझे हेच चालवत होते, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणाशी संबंध असलेली स्कॉर्पियो आणि इनोव्हा गोडी जप्त केल्यानंतर NIA ने मंगळवारी एक मर्सिडीज बेन्झ (Mercedes Benz) गाडीही जप्त केली आहे.
सचिन वाझे यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून एनआयएच्या पथकाने काळ्या रंगाची मर्सिडीज (एमएच १८-बी आर-९०९५) जप्त केली. गाडीच्या डिक्कीमध्ये एका पिशवीत चेक्सचा शर्ट, पाच लाखांची रोकड, नोटा मोजणारे मशीन, नंबरप्लेट व डायरी सापडली आहे.
ही गाडी वाझे वापरीत होते, त्याचप्रमाणे जी नंबरप्लेट आहे, ती स्कॉर्पिओला वापरण्यात आली होती. पीपीई किट वापरणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर असाच लाल रंगाचा चेक्स शर्ट असल्याचे फुटेजमधून स्पष्ट दिसत होते.
जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओमध्ये जी नंबरप्लेट वापरली होती, ती त्यामध्ये सापडली आहे. या गाडीचा वापर वाझे करीत होते. त्यांनी ती कोठून घेतली, त्याचा वापर ते कशासाठी करीत होते, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे महानिरीक्षक शुक्ला यांनी सांगितले.