Mukesh Ambani Bomb Scare: धक्कादायक खुलासा! मनसुख हिरेन यांची आत्महत्या नव्हे हत्याच?; संशय बळावला, पुरावा म्हणून... By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 11:32 AM 2021-03-08T11:32:49+5:30 2021-03-08T11:40:01+5:30
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Death Mystery, ATS Registered Murder charge in this case: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्याने मोठी खळबळ माजली होती, मात्र या प्रकरणात जी गाडी सापडली होती, त्याच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं, ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास सध्या एटीएस करत आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ गाडी सापडली होती, याचा तपास सुरू असतानाच दुसरीकडे स्कोर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ मृतदेह सापडला, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळचं वळण आलं.(Mansukh Hiren Death Mystery)
प्रथमदर्शनी मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला, परंतु हिरेन कुटुंबीयांनी ते आत्महत्या करू शकत नाही, हा घातपात आहे असा संशय व्यक्त केला होता, इतकचं नाही तर जेव्हा हा मृतदेह सापडला तेव्हा मनसुख हिरेन यांच्या तोंडात ६-७ रूमाल कोंबल्याचं आढळलं होतं, त्यामुळे या मृत्यूबद्दलचं गुढ आणखी वाढलं होतं.
यानंतर हे प्रकरण एटीएस(ATS) कडे सोपवण्यात आलं, आता यात धक्कादायक वळण समोर आलं आहे, अज्ञात आरोपीने पोलिसांचा तपास भरकटण्यासाठी एका विशिष्ट वेळी मोबाईल ऑन केला होता. यात महाराष्ट्र एटीएसने या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
प्रथमदर्शनी या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा अंदाज वर्तवला होता, त्यानंतर अनेक संशयास्पद गोष्टी यात समोर आल्याने मृत्यू आत्महत्या आहे की हत्या याचं कोडं बनलं, गृहमंत्री अनिल देशमुख या प्रकरणी विधानसभेत निवेदन सादर करू शकतात.
नवभारत टाईम्सने सूत्रांच्या माहितीने वृत्त दिलंय की, या प्रकरणात मोबाईल सर्वात मोठा पुरावा होऊ शकतो, मात्र अद्याप मोबाईल सापडला नाही, दुसरीकडे आरोपीने मनसुख हिरेन यांचा मोबाईल शेवटच्या क्षणी चालू केला होता. मोबाईल लोकेशननुसार हिरेन यांना घेऊन आरोपी वसईला गेले होते.
मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन वसई होतं, गुन्हेगारांनी रात्री साडेअकरा वाजेपर्यंत त्यांचा फोन सुरू ठेवला होता, त्यानंतर पोलीस तपास भरकटण्यासाठी तो बंद केला, खाडीत फेकण्याआधीच हिरेन यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एटीएसने मनसुख हिरेन यांची पत्नी विमल हिरेन यांच्या तक्रारीच्या आधारे काळाचौकी युनिटमध्ये अज्ञात लोकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, रविवारी आलेल्या पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार मनसुख हिरेन यांचा मृतदेह पाण्यात १० तास होता, त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होत्या, पाठीवर आणि डोळ्याखाली जखमांच्या खूना दिसत होत्या
एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार काळाचौकी एटीएसने आयपीसी कलम ३०२, २०१, ३४ आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमागे हत्या असल्याचा शंका उपस्थित झाली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात सरकारच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी एनआयएकडून करण्यात यावी अशी मागणी भाजपाने केली होती, त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित घटनेचा तपास एटीएसकडे सोपवतोय, विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे पोलिसांना द्यावेत असं सांगितले होते.
दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दावा केल्यानुसार मनसुख हे आत्महत्या करू शकत नाहीत, मात्र डीसीपीच्या वक्तव्यानुसार त्यांनी आत्महत्या केली आहे, मग यातील खरं कोण बोलत आहे? मृत्यूपूर्वी मनसुख हिरेन यांच्या फोनचं लोकेशन वसई-विरारमध्ये कसं? कांदिवलीच्या गुन्हे शाखेमधून त्यांना कोणाचा फोन आला होता का? मनसुख हिरेन यांच्या तोंडात ६-७ रूमाल कसे आले? या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचे आहे.