Mumbai Rave Party: 'कोर्ट रुममध्ये अशील कमी आणि वकील जास्त झालेत', आर्यन खानच्या सुनावणीवेळी न्यायाधीशांचा मिश्किल टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:45 PM2021-10-07T17:45:19+5:302021-10-07T17:49:20+5:30

Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी एनसीबीनं कोर्टात केली आहे. कोर्टात याप्रकरणाची सुनावणी सुरू असताना एका प्रसंगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. नेमकं काय घडलं वाचा...

मुंबईतील क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीनं आतापर्यंत एकूण १७ जणांना अटक केली आहे. तशी माहिती आज एनसीबीनं कोर्टात दिली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना कोर्ठानं ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं.

आर्यन खान याच्या कोठडीत वाढ होणार की त्याला दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. पण एनसीबीनं आज आणखी एका आरोपीला कोर्टासमोर हजर केलं आणि आर्यन खानसमोरील अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.

आर्यन खानच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील पवई येथून अचित कुमार नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून २.६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचीही माहिती एनसीबीनं आज कोर्टात दिली.

महत्त्वाची बाब म्हणजे अचित कुमार हा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच अचित कुमारच आर्यन आणि अरबाज यांना गांजा पुरवत होता अशी माहिती एनसीबीनं कोर्टात दिली आहे. अचित कुमार याचे गांजा पुरवणाऱ्या रॅकेटशी संबंध असल्याची शंका आहे असं एनसीबीनं कोर्टात म्हटलं आहे.

एनसीबीच्या दाव्यानं आर्यन खानसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अचित कुमारचं याप्रकरणाशी कनेक्शन आणि त्याच्याजवळून जप्त करण्यात आलेल्या गांजा प्रकरणी कोर्टानं त्याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. एनसीबीचं पहिलं काम तर आता झालं होतं. त्यांना अचित कुमारची कोठडी हवी होती ती आता त्यांना मिळाली. आता वेळ आली आर्यनसह एकूण ८ आरोपींना कोर्टासमोर हजर करण्याची.

आर्यन खानसह एकूण ८ जणांना कोर्टासमोर सादर करण्याची परवानगी एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी मागितली. पण त्याचवेळी अनिल सिंग यांनी कोर्टात झालेली गर्दीपाहून "८ जणांना आम्ही कोर्टासमोर सादर करू, पण कोविड नियमावली अनुसार जे या प्रकरणाशी संबंधित नाहीत. त्यांनी कृपया कोर्टाबाहेर जावं", असं आवाहन केलं.

आर्यन खानमुळे सेलिब्रिटी वलय या प्रकरणाला मिळाल्यामुळे कोर्ट रुममध्ये बरीच गर्दी झाली होती. पण अशीलांनीही वकिलांचा फौज उभी केलेली असल्यानं वकिलांचीही गर्दी कोर्ट रुममध्ये होती. त्यावर न्यायाधीशांनीही मिश्किल टिप्पणी केली. "कोर्ट रुममध्ये अशील कमी आणि वकीलच जास्त आहेत", असं न्यायाधीश म्हणाले.

न्यायाधीशांच्या विधानावर एनसीबीच्या वकिलांनीही पत्रकारांनीही गर्दी केलीय, पण त्यांना आम्ही काहीच बोलू शकत नाही, असं म्हटलं. दरम्यान, अचित कुमार याला ९ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावण्यात आल्यामुळे आता त्याच्या चौकशीतून आणखी कोणती माहिती समोर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.

दरम्यान, कोर्टात मुनमुन धमेचच्या वकिलांनी मुनमुन ही आर्यन खान किंवा अरबाज मर्चंट यांना ओळखत नसल्याचा दावा केला आहे. तसंच आर्यन खानचे वकील सतिश मानेशिंदे यांनी आर्यनकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडलेले नाहीत. आर्यननं आतापर्यंत तपासात पूर्ण सहकार्य केलेलं आहे. तो अरबाजला ओळखत असल्यानं त्याच्यासोबतच क्रूझवर गेला होता. पण त्याच्याकडे ड्रग्ज होते याच्याशी आर्यनचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे आर्यनच्या कोठडीची आता आवश्यकता नाही, असा दावा केला आहे.