Mumbai Rave Party: शाहरुख खानचा मुलगा आर्यनला का पकडलं? समीर वानखेडेंनी अखेर स्पष्टच सांगितलं... By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 11:26 AM 2021-10-07T11:26:57+5:30 2021-10-07T11:37:29+5:30
Mumbai Rave Party On Cruise: मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर एनसीबीनं टाकलेल्या छाप्यात ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आतापर्यंत एकूण १६ जणांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आता मोठा खुलासा केला आहे. मुंबतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टीकरणी अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक करण्यात आल्यानंतर हे प्रकरण हायप्रोफाइल झालं आहे. त्यात राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीची छापेमारी फेक असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.
संबंधित क्रूझवर कोणत्याही पद्धतीचं ड्रग्ज पकडण्यात आलेलं नसून आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे एनसीबीचे अधिकारी नाहीत. ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत, असा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला. त्यावर आता एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
मुंबई एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याच नेतृत्त्वात कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला होता. एनसीबीवर करण्यात आलेल्या आरोपांनंतर वानखेडे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे. यात वानखेडे यांनी नवाब मलिक यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
"आम्ही पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणामध्ये आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची संपूर्ण माहिती दिली आहे. सर्व कारवाई कायदेशीपद्धतीनंच केली गेलेली आहे", असं समीर वानखेडे म्हणाले.
बॉलीवूडमधील सेलिब्रिटिंना अटक करुन तुम्ही पोस्टर बॉय बनला आहात असं विचारण्यात आलं असता समीर वानखेडे यांनी मला काही पोस्टर बॉय वगैरे बननण्याची गरज नाही आणि अशा गोष्टींवर मी विश्वासही ठेवत नाही. आम्ही सर्व अधिकारी सरकारी कर्मचारी आहोत आणि आम्ही आमचं काम करत आहोत, असं वानखेडे म्हणाले.
"एनसीबी एक प्रतिष्ठीत संस्था असून आम्ही एनडीपीएस कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहोत आणि यापुढेही करत राहू. गेल्या वर्षभरात मुंबई आणि राज्यात आम्ही ड्रग्जमुक्त वातावरण तयार करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत आणि आकडेवारीच याची सर्व माहिती तुम्हाला देईल. गेल्या वर्षभरात आम्ही ३२० जणांना अटक केली आहे. तर दोन मोठ्या ड्रग्ज फॅक्ट्री उद्ध्वस्त केल्या आहेत. तसंच अनेक बड्या ड्रग्ज सिंडिकेट आणि टोळ्या पकडल्या आहेत", असं समीर वानखेडे म्हणाले.
आम्ही आजवर केलेल्या कारवाईतील आरोपींची सर्व माहिती वेळोवेळी माध्यमांना देत आलो आहोत. त्यामुळे आकडेवारीच सारं काही सांगते की आम्ही आतापर्यंत काय केलं आहे. एका वर्षात आम्ही १०० कोटींहून अधिक किमतीचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे आणि यापुढेही कारवाई करत राहणार आहोत, असंही ते म्हणाले.
शाहरुखच्या मुलाला अटक करण्यामागे राजकारण असल्याचा आरोप केला जात असल्याबाबत समीर वानखेडे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आरोप फेटाळून लावले. "मला यावर काहीच बोलायचं नाही. पण आम्ही एक प्रतिष्ठीत संस्थेचे कर्मचारी आहोत आणि आम्ही कोणत्याही व्यक्तीकडे पाहून कारवाई करत नाही. जे एनडीपीएस कायद्याचं उल्लंघन करतात त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करतो आणि यापुढेही कारवाई करत राहू", असं वानखेडे म्हणाले.
क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचं प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही न्यायालयासमोर सर्व काही सादर केलं आहे. जशी आणखी माहिती आम्हाला तपासात मिळेल तशी ती पुढे न्यायालयाला देत राहू. या प्रकरणासंदर्भात सांगायचं झालं तर आतापर्यंत याप्रकरणी १६ जणांना अटक झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आम्ही जप्त केले आहेत, असंही वानखेडे यांनी सांगितलं.