४२ महिलांच्या हत्येचं गूढ उकललं, पोलीस हादरले; सीरियल किलरनं का घडवलं हत्याकांड?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 04:12 PM2024-07-21T16:12:04+5:302024-07-21T16:15:59+5:30

केनियाची राजधानी नैरोबी इथं एका सीरियल किलरच्या घरातून पोलिसांना हैराण करणाऱ्या वस्तू सापडल्या आहेत. त्यासोबत या सीरियल किलरनं पोलिसांसमोर दिलेला कबुलीनामा ऐकून पोलीस अधिकारीही हादरले आहेत. आरोपी कॉलिन्स जुमैसी खालुशा याला लोक पिशाच म्हणून ओळखतात

३३ वर्षीय या आरोपीनं आतापर्यंत कमीत कमी ४२ महिलांची हत्या केली आहे. ज्यात त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. इतकेच नाही तर हत्येनंतर महिलांच्या मृतदेहाचे छिन्नविछिन्न तुकडे करून तो पोत्यात बांधायचा. त्यानंतर आरोपी एका पोलीस स्टेशनजवळील झोपडपट्टीत हे मृतदेह फेकायचा.

केनियात सध्या लिंग आधारित हिंसा आणि राजकीय उलथापालथीत हे प्रकरण उघडकीस आलं आहे. सरकार प्रमुख मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी या प्रकरणाला बळ देतंय असा आरोप विरोधकांकडून होतोय.

नैरोबी इथल्या झोपडपट्टीत ९ सांगाडे सापडल्यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला. ज्याठिकाणी स्थानिक लोक कचरा फेकायचे तिथे आरोपी मृतदेह फेकून निघून जायचा.

आरोपी महिलांना आधी लालच द्यायचा त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन घरी आणायचा आणि त्यानंतर हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करत होता. हे तुकडे पोत्यात घालून तो फेकून द्यायचा.

कोर्टात आरोपी खालुशाने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याने २०२२ पासून आतापर्यंत ४२ महिलांची हत्या केली आहे. या हत्येत त्याच्या पत्नीचाही समावेश आहे. आरोपी खालुशाच्या घरातून पोलिसांना अनेक मोबाईल फोन्स, सिमकार्ड, नाईलॉनची पोती सापडली.

खालुशाचा शिकार झालेल्या महिलांमध्ये २६ वर्षीय जोसेफिन ओविनो हीदेखील होती. तिला एकेदिवशी फोन आला त्यानंतर ती गायब झाला. तिची बहीण पेरिस केयाने तिला शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जोसेफिनचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला होता.

तपासात बहुतांश मृतदेहाचे धड आहे परंतु शिर गायब आहेत. केवळ एकच मृतदेह पूर्ण अवस्थेत सापडला. कुठल्याही मृतदेहावर गोळ्यांचे निशाण नाहीत. एकीचा गळा दाबून खून केला होता. इतके दिवस बेपत्ता महिलांचा शोधण्यात पोलीस अपयशी ठरली त्यामुळे लोक पोलिसांवर रोष व्यक्त करत आहेत. ज्याठिकाणी मृतदेह फेकले जायचे तिथेच पोलीस स्टेशन होते.

केनियात सध्या करवाढ आणि सरकारी भ्रष्टाचार याविरोधात देशात आंदोलन सुरू आहेत अशावेळी हे प्रकरण समोर आल्यानं विरोधकांनी सरकारवर आरोप केले आहेत. आंदोलनावरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकार खालुशाचा वापर करत आहे असं विरोधक सांगतायेत.

मात्र ४२ महिलांच्या हत्याकांडानं देशात खळबळ माजली आहे. खालुशाला अटक करून कोर्टात हजर केले. त्यावेळी त्याच्या वकिलांनी त्याची मानसिक स्थिती आणि आरोग्य ठीक नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र कोर्टाने खालुशाच्या कस्टडीत आणखी वाढ केली.