बंगळुरू मर्डर केसमध्ये नवा ट्विस्ट! जिवंत पत्नीला सुटकेसमध्ये पॅक केलं; हँडल तुटले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:15 IST2025-04-02T12:10:50+5:302025-04-02T12:15:12+5:30

बंगळुरू येथे पत्नीला ठार करून पुण्याला पळून आलेल्या गौरी खेडेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. राकेश खेडेकरने पत्नी गौरीला ६ वेळा चाकू मारून तिला मृत असल्याचं समजून सुटकेसमध्ये भरलं. परंतु सुटकेसमध्ये तिचा श्वास सुरूच होता. गौरीला सुटकेसमध्ये भरून तिला मृत समजून राकेश तिच्यासोबत रात्री उशीरापर्यंत बोलत राहिला आणि गौरी सुटकेसमध्ये श्वास घेत तडफडत होती.
२ वर्षापूर्वी राकेश आणि गौरीचं लग्न झाले होते. दोघे मूळचे महाराष्ट्रातील होते. परंतु कामासाठी ते अलीकडेच बंगळुरूत शिफ्ट झाले होते. या दोघांमध्ये छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे. लग्नाच्या आधीपासून हे एकमेकांना ओळखायचे. दोघांमध्ये नातेही होते. मात्र या दोघांमधील वाद इतक्या टोकाला जाईल याची कल्पनाही कुणी केली नाही.
२६ मार्चच्या रात्री दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात गौरीने पती राकेशला मारायला सुरुवात केली. राकेशने याआधी कधी गौरीच्या कृत्यावर फार प्रत्युत्तर दिले नव्हते. परंतु त्यादिवशी त्याने किचनमधून चाकू उचलला आणि गौरीवर हल्ला करायला सुरुवात केली. या हल्ल्यात जखमी गौरी जमिनीवर बेशुद्ध पडली. चाकू हल्ल्याने ती गंभीर झाली होती.
काही काळ राकेशलाही जे घडलं ते कळलं नाही. राकेशने गौरीचा मृतदेह ठिकाण्यावर लावून पळून जाण्याचा विचार करत होता. त्याने गौरीला सुटकेसमध्ये पॅक करून कुठेतरी फेकून द्यायचे ठरवले. या गोंधळात त्याने घरातील मोठी सुटकेसची बॅग खाली केला आणि गौरीला त्यात कोंबून रात्रीच बाहेर पडणार होता.
परंतु राकेशच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही. सुटकेसचा हँडल तुटून त्याच्या हातात आला. विना हँडल इतकी वजनदार सुटकेस फरफटत नेणे आणि मृतदेहाची विल्हेवाट लावणे शक्य नव्हते. तेव्हा तो सुटकेसशेजारी बजून गौरीच्या मृतदेहाशी बोलत बसला होता. २७ मार्चला सकाळी राकेशने गौरीला त्याच सुटकेसमध्ये ठेवून कारने पुण्यासाठी रवाना झाला. त्यानंतर काय घडले ते सगळ्यांनाच माहिती आहे.
पोलिसांनी जेव्हा बंगळुरूच्या घरातून सुटकेसमध्ये बंद गौरीचा मृतदेह ताब्यात घेतला. तेव्हा फॉरेन्सिक तपासात सुटकेसमध्ये म्यूकस म्हणजे श्लेष्मा नावाचा शरीरातून निघणारा द्रव होता. हे तेव्हाच होते जेव्हा माणूस जिवंत असतो, कारण मृत माणसाचा श्वास थांबलेला असतो त्यातून श्लेष्मा बाहेर येण्याची शक्यता नसते.
परंतु जर कुणाला जिवंत असताना सुटकेसमध्ये ठेवले तर तो श्वास घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या प्रयत्नात म्यूकस बाहेर येतो. म्हणजे गौरीवर चाकू हल्ला झाल्यानंतर तिला सुटकेसमध्ये पॅक करून तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा सुरू असताना गौरी जिवंत होती. राकेश रात्री उशीरा मृत समजून गौरीशी बोलत होता तेव्हा तिचा श्वासोश्वास सुरू होता.
राकेशने ज्या सुटकेसमध्ये गौरीला भरले त्याचा हँडल तुटल्याने त्याचा प्लॅन फिस्कटला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं प्लॅनिंग त्याने रद्द केले. या प्रकरणी पोलीस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ तपास करत आहेत. घटनास्थळी सुटकेसचे तुटलेले नट बोल्टही सापडले आहेत.
पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये गौरीवर ६ वेळा चाकूने हल्ला झाल्याचं समोर आले. डॉक्टर म्हणाले की, गौरीच्या गळ्यावर ३ चाकू हल्ले, तर ३ चाकूचे वार तिच्या पोटाच्या खालच्या बाजूस झालेत. ज्यातून खूप रक्त वाहिले. गौरीचा मृत्यू श्वास रोखल्याने झाला की जास्त रक्तस्त्राव झाल्याने झाला हे अद्याप समोर आले नाही.
दरम्यान, पत्नीच्या खुनानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. साताऱ्यातील शिरवळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेत बंगळुरू पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र विष प्राशन केल्याने शिरवळ येथील खासगी रुग्णालयातून पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते.