नवा खुलासा! पायलला बनायचं होतं सीरियल किलर; बदला घेण्यासाठी रचलं होतं षडयंत्र By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 12:29 PM 2022-12-04T12:29:48+5:30 2022-12-04T12:32:13+5:30
टीव्हीवरील मालिका पाहून सीरियल किलर बनणारी पायल आता पोलिसांच्या तावडीत आहे. स्वत:ला मृत दाखवण्यासाठी तिने निष्पाप हेमलताचा जीव घेतला. आई वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी माणुसकीच्या सर्व सीमा ओलांडल्या. त्यासाठी तिने जगातून स्वत:चं अस्तित्व नष्ट करण्याचं ठरवलं.
जगासमोर मृत असलेल्या दाखवण्यासाठी पायलने बॉयफ्रेंडसोबत मिळून हेमलताचा खून केला. इतकेच नाही तर तिचा चेहरा ओळखू येऊ नये यासाठी उकळतं तेल तिच्या चेहऱ्यावर टाकलं. त्यानंतर स्वत:चे कपडे तिला घालून फरार झाली.
हेमलताचा चेहरा जळालेला होता. ती शारिरीक दृष्ट्या पायलसारखीच दिसत होती. त्यामुळे ती पायल आहे की अन्य कोणी हे समजत नव्हतं. मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट आढळली. त्यामुळे पायलनं आत्महत्या केलीय हे सिद्ध झाले. त्यानंतर पायलच्या भावानं बहिणीचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार केले.
पायलनं स्वत:ला मृत दाखवण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड अजयसोबत मिळून सोशल मीडियावर ५० हून अधिक मुली पाहिल्या. अखेर अजयला हेमलताबद्दल त्याच्या मित्राकडून कळालं. जी त्यांच्या प्लॅनिंगनुसार अगदी परफेक्ट होती.
सीरियल किलर बनण्याचं भूत पायलच्या डोक्यात भिनलं होते. संपूर्ण षडयंत्र रचण्यात टीव्ही मालिका कुबूल से आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील क्रिमिनल डॉक्यूमेंट्रीची मदत झाली. परंतु अजय-पायलनं रचलेला कट जास्त काळ टिकला नाही. त्यामुळे दोघांना हेमलताच्या मर्डरच्या आरोपाखाली अटक झाली.
पोलिसांच्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबरला हेमलता नावाची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर हेमलताचं कॉल ट्रेसिंग करण्यात आले. त्यात अजय नावाच्या अज्ञात मुलाचा नंबर सापडला. पोलिसांनी अजयला ताब्यात घेत चौकशी केली. तेव्हा चौकशीत पायलसोबत मिळून दोघांनी हेमलताची हत्या केल्याचं उघड झाले.
पायल भाटीने आई वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी आणि प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी स्वत:ला मृत बनवण्याचं षडयंत्र रचलं. ती आई वडिलांच्या आत्महत्येसाठी भावाच्या सासरच्यांना जबाबदार मानायची. त्यामुळे त्यांना संपवण्याचा डाव तिने रचला.
पायलच्या षडयंत्रात तिचा बॉयफ्रेंड अजय ठाकूर सहभागी होता. या दोघांनी मिळून मृतदेहाचा चेहरा ओळखता येऊ नये म्हणून उकळतं तेल हेमलताच्या चेहऱ्यावर टाकलं. त्यानंतर हेमलताला पायलचा ड्रेस घालून तिथून फरार झाले.
या दोघांनी जाताना हेमलताच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात लिहिलं होतं की, जेवण बनवताना माझा चेहरा जळाला. या चेहऱ्यासह मला आयुष्यभर जगण्याची इच्छा नाही. त्यासाठी मी आत्महत्या करत आहे असं लिहिण्यात आले होते.
या घटनेवर आरोपी पायल म्हणाली की, आई वडिलांच्या आत्महत्येसाठी ४ जण जबाबदार होते. वहिणीच्या घरातले आणि आत्याचा मुलगा ते त्रास द्यायचे. खोटे गुन्हे दाखल करायचे त्यामुळे त्रस्त होऊ आई वडिलांनी हत्या केली. मला खेद आहे की माझ्या आईवडिलांचे गुन्हेगार जिवंत आहेत. मात्र त्यांच्यामुळे मी निष्पाप मुलीचा खून केला असं तिने म्हटलं.