रहस्यमय! एकाच कुटुंबातील ११ जणांच्या मृत्यूचं गुढ उकलेना; हत्या, आत्महत्या की तंत्रमंत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 08:18 PM2020-08-10T20:18:04+5:302020-08-10T20:22:52+5:30

राजस्थानात सीमावर्ती एका गावात एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली, या लोकांची हत्या झाली की आत्महत्या आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र आता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होत आहे. कारण या प्रकरणात कधी कुटुंबात वाचलेला एकमेव सदस्यावर शंका उपस्थित होतेय तर कधी मृतांपैकी एका महिलेवर हत्या केल्याचा संशय येत आहे.

जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील ११ जणांच्या मृतदेहाने सगळ्यांची झोप उडवली आहे. अनेक संघटनांनी यात सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा छडा लावू शकणार नाही असं संघटनांचे म्हणणं आहे.

पाकिस्तानातून आलेल्या ११ शरणार्थींच्या मृत्यूने शरणार्थी संघटनेचे हिंदू सिंह सोढा यांनी सांगितले की, जी सुसाईड नोट सापडली आहे त्यात मंडोर पोलिसांवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून केली जाऊ नये.

हा आरोप गंभीर असूनही या प्रकरणी पोलिसांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही ही आश्चर्याची बाब असल्याचे सोढा यांनी म्हटले आहे. पोलिसांबरोबरच अशा लोकांवर असे आरोप आहेत की जे या पाकिस्तानातील विस्थापित लोकांना त्रास देत असत. त्यांच्यावर पोलिसांनाही कारवाई करायला हवी होती पण केली नाही. अशा परिस्थितीत आता या प्रकरणाची चौकशी सीबीआयसारख्या उच्च-स्तरीय एजन्सीने करायला हवी.

त्यासोबत भारतात शरणार्थी आलेल्या पाकच्या नागरिकांसाठी काम करणार्‍या निमकेतमचे भागचंद भिल म्हणाले की, नागरिकत्व नसल्यामुळे आपल्याला अधिक संघर्ष करावा लागतो. ११ लोकांच्या मृत्यूबद्दल उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

कृषी बाजाराचे माजी अध्यक्ष कीर्तिसिंह भिल म्हणाले की, सरकारने पीडित कुटुंबाला योग्य मोबदला द्यावा आणि उच्चस्तरीय चौकशी व्हावी. विशेष म्हणजे या कुटूंबाशी संबंधित एक खटला मंडोर पोलिस ठाण्यात नोंदविला गेला आहे, यासाठी बऱ्याच काळापासून तपास चालू आहे. पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही असे सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. त्याच वेळी सर्व ११ पाकिस्तानी विस्थापित लोकांच्या मृत्यूचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर हिंदू प्रथेद्वारे जोधपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

जोधपूर जिल्ह्यातील किला बाटा गावात पाकिस्तानहून आलेल्या हिंदू निर्वासित बुद्धाराम यांचे कुटुंब गेल्या ३ महिन्यांपासून शेतीच्या कामासाठी राहत होते. या कुटुंबात १२ लोक होते.

कुटुंबात एकमेव वाचलेल्या रामच्या म्हणण्यानुसार, शनिवारी रात्री प्रत्येकाने जेवण केले होते व तो नीलगायला पळवण्यासाठी शेतात गेला असता तेथेच तो झोपी गेला आणि सकाळी जेव्हा तो घरी परतला तेव्हा संपूर्ण कुटुंब संपले होते. मृतदेहाजवळून पोलिसांनी विषाच्या बाटली आणि इंजेक्शन्स देखील जप्त केले.

प्राथमिक चौकशी दरम्यान असे आढळले आहे की जोधपूरमध्ये फक्त राम आणि त्याचा भाऊ रवी यांचे एकाच कुटुंबात लग्न झाले होते. त्यांच्या ४ बहिणी असून त्यापैकी दोन नर्सिंग कोर्स घेतल्यानंतर पाकिस्तानातून आल्या असं पोलिसांनी सांगितले.

दोन बहिणींचे नाते संबंध जोधपूरच्या एकाच कुटुंबातही झाले. एक बहिण लग्न करून जवळच राहिली होती. कौटुंबिक वादविवाद बऱ्याच काळापासून सुरु होते. याच कारणास्तव, बुद्धारामाचा एक मुलगा पुन्हा पाकिस्तानला परतला.

दोन्ही कुटुंबे डिसेंबर २०१५ मध्ये पाकिस्तानातून आली होती. येथे वास्तव्य करूनही त्यांना भारताचे नागरिकत्व मिळाले नाही. परंतु त्यांनी आधार कार्ड तयार केले होते. या प्रकरणात एकमेव वाचलेल्या रामचा आरोप त्याच्या सासरच्यांनी खून केला असा आहे.

त्याचबरोबर असा अंदाज वर्तविला जात आहे की ३८ वर्षीय प्रिया उर्फ प्यारीने विषाचं इंजेक्शन देऊन सगळ्यांची हत्या केली. प्रिया ही बुद्धारामची मुलगी होती. पोलिसांना मृतदेहाजवळ विषाची बाटली आणि इंजेक्शन्स सापडली आहेत.

प्रियाने कुटुंबातील सर्व सदस्यांना विषारी इंजेक्शन देऊन मारलं, कारण तिने पाकिस्तानात नर्सिंग कोर्स केला होता. मृतांपैकी १० जणांच्या हाताला सुईने टोचल्याचं दिसून येते तर प्रियाच्या पायावर सुईचं निशाण आहे. त्यामुळे प्रियाने सगळ्यांना इंजेक्शन देऊन स्वत: आत्महत्या केली असा पोलिसांना संशय आहे.

या सर्वांचा मृत्यू उंदिर मारण्याच्या विषारी औषधांमुळे झाल्याचं तपासात समोर आलं आहे. घटनास्थळी अल्प्राजोलम टॅबलेट सापडलं, जे झोपेच्या औषधासाठी वापरलं जातं.

या प्रकरणात मृत्यूचे आणखी एक अंदाज समोर येत आहे की, काही दिवसांपासून दोन्ही कुटूंबिय चेटूक व तांत्रिक संबंधात अडकले होते. दिल्लीतील बुरारीच्या घटनेसारख्या सामूहिक आत्महत्येचेही हे प्रकरण आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Read in English