Sachin Vaze: ‘त्या’ एका चुकीमुळं सचिन वाझेचा संपूर्ण डाव फसला अन् स्वत:च चौकशीच्या जाळ्यात अडकला By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 09:29 AM 2021-04-10T09:29:04+5:30 2021-04-10T09:34:13+5:30
Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याच्या प्रकरणी सचिन वाझेला अटक केली. त्यानंतर त्याच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले होते. NIA ने २७ दिवसांच्या कोठडीनंतर शुक्रवारी सचिन वाझेची तळोजा जेलमध्ये रवानगी केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांप्रकरणी NIA चा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता सचिन वाझेची चौकशी करण्याची गरज नाही असं NIA ने कोर्टात सांगितलं.
पण त्याचवेळी NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणानंतर आणखी एक मोठा डाव आखण्याच्या तयारीत होता. जिलेटिन कांडानंतर काही दिवसांनी एका एन्काऊंटरची प्लॅनिंग करण्यात आली होती.
ज्या लोकांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं असलेली गाडी उभी केली होती. ते एन्काऊंटरमध्ये मारले गेले असा बनाव सचिन वाझे करणार होता. मात्र अद्याप हे स्पष्ट नाही की, या एन्काऊंटरमध्ये मनसुख हिरेन याला मारण्यात येणार होतं की आणखी कोणतं नाव यात सामील होतं?
सूत्रांच्या माहितीनुसार, एन्काऊंटरसाठी २ अन्य व्यक्तींची ओळखही करण्यात आली होती. एन्काऊंटरनंतर जिलेटिन स्फोटकं प्रकरणाचा तपास संपला असता. या प्रकरणाचा तपास स्वत: सचिन वाझे करत होता. मात्र जिलेटिनमुळे या प्रकरणाला दहशतवादी वळण लागलं आणि तपासात NIA आणि ATS यांना यावं लागलं.
स्फोटकं ठेवल्यानं सचिन वाझेचं संपूर्ण प्लॅनिंग फसलं आणि वाझेचा डाव त्याच्यावरच उलटला. सचिन वाझेला या प्रकरणात NIA ने अटक केली. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत गेले. अखेर सचिन वाझेविरोधात भक्कम पुरावे NIA ने गोळा केले.
त्याचसोबत नोव्हेंबरमध्ये औरंगाबादमधून एका व्यक्तीची कार चोरीला गेली होती. सचिन वाझेच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशनमध्ये त्या कारचा नंबर मिठी नदीतून बाहेर काढण्यात आला. कदाचित याच गाडीतून आरोपी आल्याचं दाखवण्यात येणार होतं असा सूत्रांचा अंदाज आहे.
याच कारची नंबरप्लेट ४ मार्च आणि मुंबईत काही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. ४ मार्चला मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. सचिन वाझेला जेलमध्ये पाठवण्याअगोदर शुक्रवारी CBI ने NIA कार्यालयात जाऊन अनिल देशमुख प्रकरणात चौकशी केली.
NIA ने सचिन वाझेकडून जे पुरावे गोळा केलेत ते सीबीआयसोबत शेअर केलेत. या प्रकरणात अनेक खुलासे झाले असले तरी आणखी काही खुलासे बाकी आहेत. एवढा मोठा डाव फक्त सचिन वाझे एकटे करू शकत नाहीत. मग त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? स्कोर्पिओमध्ये ठेवलेलं जिलेटिन कोणी आणि कधी आणलं याचा खुलासा होणं बाकी आहे.
अँटेलीया आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाझे यांचे पत्र लीक झाल्याबद्दल राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) कोर्टाकडे तक्रार केली होती, त्यावर कोर्टाने सचिन वाझे यांच्या वकिलांना फटकारले आणि आतापासून तसे होऊ नये अशी कडक सूचना दिली
दरम्यान, नवीन गृहमंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यासंदर्भात माहिती नाही. मात्र, परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणावर चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी अद्याप मौन सोडले नाही. मात्र, योग्य वेळ येताच मुख्यमंत्रीही याबाबत बोलतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.