जंगलातील खजिना, ६ जणांची हत्या, १७ वर्ष जेल अन् पुन्हा तोच खूनी खेळ सुरू...

By प्रविण मरगळे | Published: January 6, 2021 11:25 AM2021-01-06T11:25:30+5:302021-01-06T11:28:20+5:30

मध्य प्रदेशच्या राजधानी भोपाळमधील पोलिसांनी एका अशा सिरिअल किलरला अटक केली आहे जो सोन्याच्या तिजोरीचं आमिष दाखवून लोकांकडून पैसे लुबाडत होता आणि पैसे परत मागू नये यासाठी त्यांची हत्या करत होता.

या धक्कादायक घटनेत सिरिअल किलरला पोलिसांनी अटक केली आहे, या आरोपीने आतापर्यंत ६ जणांची हत्या केली होती, तिजोरीच्या बहाण्याने लोक त्याच्या जाळ्यात ओढले जात होते, आमिष दाखवल्याने अनेकांनी त्याला पैसे दिले होते.

८ नोव्हेंबर २०२० भोपाळच्या जवळील सुखी सेवनिया गावातील जंगलात पोलिसांना एक मृतदेह सापडला. या मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने चिरडला गेला होता. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला.

तपासानंतर आदिल वहाब नावाच्या युवकाचा मृतदेह असल्याची ओळख पटली, परंतु जंगलातील निर्जन ठिकाणी घडलेल्या हत्येबाबत त्यांच्याकडे कोणतेही साक्षीदार नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला पकडणं मोठं आव्हान बनलं होतं.

या घटनेची पोलीस चौकशी करत असताना त्यांना समजलं की, मनीराम सेन नावाच्या व्यक्तीने मृत व्यक्तीला तिजोरीचं आमिष दाखवण्यात आलं होतं, त्या बदल्यात मृत व्यक्तीकडून १७ हजार रूपये घेतले होते, अनेक दिवस खजिना मिळाला नाही, त्यानंतर आदिलने मनीरामकडे पैसे परत मागण्यास सुरूवात केली.

यानंतर मनीरामने आपल्या साथीदारांसोबत आदिलला सुखी सेवनिया येथील जंगलात घेऊन गेला, त्याठिकाणी पूजेच्या बहाण्याने आदिलला डोळे बंद करण्यास लावले, त्यानंतर संधी साधून मनीरामने आदिलच्या डोक्यावर मागून वार करून हत्या केली, मृतदेहाची ओळख कोणालाही पटू नये यासाठी त्याचा चेहरा दगडाने चिरडला.

पोलिसांनी या घटनेचा तपास करताना मृतकाचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबासह ७४ जणांची चौकशी केली, त्यावेळी मनीराम सेन नावाच्या व्यक्तीचं नाव तपासात समोर आलं. आदिलला ठार केल्यानंतर मनीराम फरार झाला होता, सुखी सेवनिया गावच्या पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी २० हजारांचे बक्षीस घोषित केले होते, घटनेनंतर आरोपी मनीराम फरार झाला तसेच स्वत:जवळ मोबाईलही ठेवला नाही

आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी जाळं फासलं, त्यानंतर मनीराम इलाहाबादच्या सागर जिल्ह्यातील राहतगड येथे येणार असल्याचं कळालं, पोलिसांनी मनीराम यांना अटक केल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.

आरोपी जंगलमध्ये खजिना आहे असं सांगून लोकांकडून पैसे उकळत होता, जेव्हा खजिना मिळत नसे तेव्हा लोक त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावत होते, यानंतर मनीराम या लोकांना पूजेच्या बहाण्याने जंगलात बोलावून त्यांची हत्या करत होता.

आरोपीने यापूर्वी ५ हत्या केल्याचं उघड झालं आहे, २००० मध्ये त्याने ५ हत्या केल्या होत्या, त्यासाठी मनीरामला जन्मठेपेची शिक्षा झाली, २०१७ मध्ये तो जेलमधून सुटला, त्यानंतर पुन्हा एकदा खजिन्याचं आमिष दाखवून मनीराम लोकांची फसवणूक करून त्यांची हत्या करू लागला, मात्र पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.