Shraddha Murder Case : तिहार जेलमध्ये 'अशी' गेली आफताबची पहिली रात्र; आरामात झोपला, चेहऱ्यावर नव्हतं टेन्शन अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 02:46 PM2022-11-27T14:46:30+5:302022-11-27T15:00:58+5:30

Shraddha Murder Case : आफताबला तिहारच्या जेल क्रमांक चारमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभर हादरला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी आणि श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने आपला गुन्हा कबूल केला आहे. गळा आवळून आफताबने श्रद्धची हत्या केली. त्यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले. 300 लीटर क्षमतेचा फ्रिज विकत घेतला होता.

आफताब रोज एक-दोन तुकडे जंगलामध्ये फेकून त्याची विल्हेवाट लावत होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. श्रद्धा हत्या प्रकरणाची सध्या देशभरात मोठी चर्चा होत आहे. श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला न्यायालयाने 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आफताबला तिहारच्या जेल क्रमांक चारमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली एका स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. तिहारमध्ये आफताब पूर्णपणे टेन्शन फ्री दिसला. आफताब पोलिसांच्या श्रद्धाच्या हत्येबाबत उलट-सुलट माहिती देत आहे.

तिहार जेलमध्ये आफताबची पहिली रात्र अगदी आरामात केली, जेलमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब अगदी आरामात झोपला होता. याआधी देखील जेलमध्ये असताना तो आरामात झोपलेला पाहायला मिळालं होते. तसंच आता तिहारमध्ये देखील तो निवांत झोपल्याचं दिसतं.

पॉलिग्राफ टेस्टनंतर आफताबला कोर्टाने तिहार जेलमध्ये पाठवलं आहे. आफताबच्या सुरक्षेबाबत जेल प्रशासन अत्यंत अलर्ट आहे. त्याच्यावर पोलीस नजर ठेवून आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातूनही त्याच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. त्याला जेवण देण्याआधी त्याची तपासणी केली जाते.

काही दिवसांपूर्वी आफताबचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पाहायला मिळाला. पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात कोणताच खेद जाणवला नाही. त्याला या गोष्टीचा पश्चाताप देखील नसल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी अटक केल्यावर आफताब एकदाच रडला. आफताबचे वडील अमीन पुनावाला कोठडीत त्याची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आफताबच्या डोळ्यात अश्रू होते अशी माहिती समोर आली आहे. आफताबचा जेलमधील व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

आफताबने आता पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. आफताबने पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर करण्यात आला होता असं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत, पोलिसांनी 5 मोठे चाकू जप्त केले आहेत जे तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले आहेत अशी माहिती दिल्ली पोलीस सुत्रांनी दिली आहे.

श्रद्धा हत्याकांडाच्या तपासादरम्यान पोलिसांना नवनवीन माहिती मिळत आहे. पोलिसांना आता श्रद्धाचे जुने फोटो आणि Whatsapp चॅट सापडले आहे. ज्यामध्ये श्रद्धाने आफताब मारत असल्याचे सांगितले. तपासादरम्यान आफताबची चौकशी केल्यानंतर आता आफताब हा सीरियल किलर असण्याची शक्यताही पोलिसांना आहे.

आफताबच्या संपर्कात आलेल्या इतर मुलींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. त्याच्या डिजिटल फूटप्रिंटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. आफताब डेटिंग एपच्या माध्यमातून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा, त्यामुळे पोलीस त्याची हिस्ट्री चेक करण्यात व्यस्त आहेत.

श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे करून जंगलात फेकून देणाऱ्या नराधम आफताबच्या चौकशीदरम्यान सातत्याने नवनवीन माहिती देऊन पोलिसांना हैराण करत आहे. आफताबच्या जबाबात सततच्या विसंगतीमुळे आफताब अजूनही काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

आफताब हा सिरीयल किलर असण्याची दाट शक्यता आहे. त्याच्या वागण्या-बोलण्यातून असे दिसते की, त्याने श्रद्धासोबत जे केले, ते त्याने आधीही केले असावे. पोलिसांनी त्याचा डिजिटल फूटप्रिंट आणि तो ज्या मुलींच्या संपर्कात आला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. श्रद्धासोबत राहण्याआधीही आफताबचे अनेक मुलींशी संबंध होते.