shraddha walker murder case delhi police aftab poonawala packers and movers
श्रद्धा हत्या प्रकरण: हत्येच्या १८ दिवसांनंतर आफताबनं मागवल्या ३७ वस्तू, मुंबईतून मिळाला महत्वाचा पुरावा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 07:51 AM2022-11-21T07:51:09+5:302022-11-21T07:58:11+5:30Join usJoin usNext देशाला हादरवून टाकणारा श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आरोपी आफताब याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली पोलिसांची टीम जंगलात तसंच कचऱ्याचे ढीगही तपासून पाहात आहे. श्रद्धाच्या कवटी आणि जबड्याचा काही भाग सापडल्यानंतर मोठं यश मिळालं आहे. पण अजूनही पोलीस जास्तीत जास्त पुरावे जमा करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी छतरपूरच्या एनक्लेव तलावात देखील शोधकार्य राबवलं जात आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्यांकाडाच्या प्रकरणाच्या खोलाशी जाण्यासाठी आरोपी आफताबच्या नार्को टेस्टचीही तयारी सुरू केली आहे. या प्रकरणाशी निगडीत बारीक बारीक गोष्टी चाचपडून पाहिल्या जात आहे. यात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता दिल्ली पोलिसांच्या चौकशीत नवी माहिती समोर आली आहे की आफताबनं श्रद्धाची हत्या केल्यानंतर थेट मुंबईजवळील वसई येथून ३७ वस्तू दिल्लीला मागवल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी गुडलक पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीशी निगडीत गोविंद यादव याची चौकशी केली. नयनगर पोलीस ठाण्यात दिल्ली पोलिसांच्या टीमनं गोविंद यादव याचा जबाब नोंदवला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आफताबनं श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर १८ दिवसांनंतर म्हणजेच ५ जून रोजी काही सामान मुंबईहून ऑर्डर केलं होतं. दिल्ली पोलिसांना याची रिसीप्ट देखील प्राप्त झाली आहे. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या पावतीवर तारीख ५ जूनची आहे. यात एकूण ३७ वस्तू ऑर्डर करण्यात आल्या आहेत. मुंबईजवळील वसई येथून या गोष्टी आणून त्या दिल्लीत आफताबला देण्यात आल्या आहेत. आफताबनंच श्रद्धाची हत्या केल्यानंतर या गोष्टी ऑर्डर केल्याचं सांगितलं जात आहे. पावतीवर त्याचंच नाव आहे. पावतीचीवरची तारीख पाहता या गोष्टी त्यानं श्रद्धाच्या हत्येनंतर मागवल्याचंही निष्पन्न झालं आहे. दिल्ली पोलिसांनी गोविंद यादवचा जबाब नोंदवल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यानं दिलेल्या माहितीनुसार आफताब यानंच या वस्तूंसाठीची बुकिंग केलं होतं. ज्यावेळी आफताबनं ऑर्डर दिली तेव्हा आपण गावी गेलो होतो आणि इतर कर्मचाऱ्यांनी संबंधित सामान मुंबईहून दिल्लीला शिफ्ट केलं होतं, असं गोविंद यादवनं सांगितलं. आफताबनं केलेल्या बुकिंग संदर्भातील सर्व कागदपत्र पोलिसांना सुपूर्द केल्याचंही तो म्हणाला. नेमकं काय काय ऑर्डर केलं होतं? आफताबनं वसईहून दिल्लीला शिफ्ट केलेल्या सामनात नेमकं काय काय होतं याबाबतही गोविंद यादवनं माहिती दिली आहे. त्यानं दिलेल्या माहितीनुसार आफताबनं घरगुती सामान ऑर्डर केलं होतं. यात घरात वापरल्या जाणाऱ्या दैनंदिन गोष्टींचा समावेश होता. आफताबचं पार्सल दिल्लीला शिफ्ट केल्यानंतर पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीचा कर्मचारी गोविंद यादव यानं आरोपीशी त्यानंतर कोणताही संवाद किंवा संपर्क साधलेला नसल्याचंही सांगितलं. तलावात शीर शोधण्याचा प्रयत्न आफताबनं जंगलात श्रद्धाच्या शरीराचे तुकडे टाकले होते. यातील काही तुकडे पोलिसांना प्राप्त झाले असले तरी अद्याप श्रद्धाचं शीर सापडलेलं नाही. दिल्ली पोलिसांना आता छतरपूर एनक्लेवच्या तलावात पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका इनपूट आधारे आता तलाव रिकामी करण्याचं काम केलं जात आहे. आफताबनं श्रद्धाच्या हत्येनंतर तिचं शीर याच तलावात फेकल्याचा संशय पोलिसांना आहे. लवकरात लवकर नार्को टेस्ट व्हावी दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाची दिशाभूल करण्याचं काम आफताब करत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी आफताबच्या नार्को टेस्टचीही परवानगी कोर्टाकडून घेतली आहे. आता ही चाचणी लवकरात लवकर व्हावी यासाठी दिल्ली पोलीस प्रयत्न करत आहेत. आफताबची तातडीनं नार्को टेस्ट करावी अशा सूचना दिल्ली पोलिसांनी एफएसएल टीमला दिल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी या टेस्टमध्ये आफताबला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी देखील तयार केली आहे. महरौलीच्या जंगलात सापडले अवशेष आफताबनं आतापर्यंत दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी महरौलीच्या जंगलातून श्रद्धाच्या शरीराचे अवशेष जप्त केले आहेत. फॉरेन्सिक टीमच्या अहवालानंतर संबंधित अवशेष मनुष्याचेच असल्याचं निष्पन्न झालं आहे. आता ते श्रद्धाचेच अवशेष आहेत की नाही यासाठी तिच्या वडिलांच्या डीएनएचे सॅम्पल देखील घेण्यात आले आहेत. याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. आफताबनं दिल्ली पोलिसांच्या चौकशीत गुन्हा कबुल केला असून त्यानंच श्रद्धाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर तिचे ३५ तुकडे केल्याचं मान्य केलं होतं. दररोज दोन-दोन तुकडे तो एका पिशवीत बांधून महरौलीच्या जंगलात जाऊन टाकत असे. टॅग्स :श्रद्धा वालकरShraddha Walker Murder Case