Shraddha Walker Murder Case: श्रद्धा प्रकरणात डीसीपींचा खुलासा; 'पत्रावर पोलिसांनी कारवाई केलेली, पण...' By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:44 PM 2022-11-23T19:44:57+5:30 2022-11-23T19:50:36+5:30
श्रद्धाने हत्येच्या दीड वर्षे आधी पोलिसांना पत्र दिले होते. पण वारंवार ब्रेकअप होऊनही ती आफताबबरोबर परत का जात होती? श्रद्धा मर्डर केसमध्ये आजचा दिवस भूकंप आणणारा ठरला, श्रद्धाने पोलिसांना आफताब आपल्या शरीराचे तुकडे करणार आहे, असे पत्रात म्हटले होते. यावरून जर पोलिसांनी कारवाई केली असती तर श्रद्धा आज वाचली असती असे बोलले जात आहे. दोन वर्षांपूर्वी श्रद्धाने पालघर पोलिसांना हे पत्र लिहिले होते.
२३ नोव्हेंबर २०२० ला पालघर पोलिसांना एक पत्र दिले होते. यात पोलिसांना तिने लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला तिला मारहाण करतो, असे म्हटले होते. वेळेवर कारवाई केली नाही तर तो तिचे तुकडे तुकडे करेल असे तिने म्हटले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील य़ाची चौकशी केली जाईल असे म्हटले आहे.
श्रद्धाने आफताब जे वागत होता, ते त्याच्या कुटुंबियांना देखील सांगितले होते. परंतू, त्यांनीही याकडे लक्ष दिले नाही, असे सांगितले जात आहे. आफताबची फॅमिली बेपत्ता झाली आहे. तर या साऱ्या प्रकरणावर आता पालघर पोलिसांची स्पष्टोक्ती आली आहे. दै. भास्करने याचे वृत्त दिले आहे.
पालघर पोलिसांना जेव्हा श्रद्धाची तक्रार मिळाली तेव्हा तिच्या तक्रारीवरून आवश्यक कारवाई करण्यात आली होती. मात्र, नंतर तिनेच आमच्यात सर्व मिटले असल्याचे लिहून दिले होते. यामुळे ते प्रकरण बंद करण्यात आले, असे डीसीपी सुहास बावचे यांनी म्हटले आहे.
श्रद्धाने आपली तक्रार मागे घेतली. आफताबने समजूत काढल्यावर श्रद्धाने त्याचे ऐकले आणि तक्रार मागे घेण्याचा निर्णय घेतला. दोघे पुन्हा एकत्र राहू लागले. श्रद्धाच्या वडिलांनी सांगितले की, आफताबने श्रद्धाला १४ पेक्षा जास्त वेळा मारहाण केली होती. श्रद्धाने आफताबवर खूप विश्वास ठेवायला सुरुवात केली होती. आफताबने श्रद्धाला घाबरवले असावे. त्यामुळेच श्रद्धाने आफताबविरुद्धची तक्रार मागे घेतली असावी.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा आणि आफताबचा एक कॉमन फ्रेंडही समोर आला असून तो ड्रग्ज विकायचा. श्रद्धा आणि आफताबचे अनेकवेळा ब्रेकअप झाले होते, परंतू पुन्हा ते एकत्र यायचे आणि राहू लागायचे.
दिल्ली पोलिसांनी बुधवारी मुंबईत जाऊन श्रद्धाच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवले. त्यांना श्रद्धा आणि आफताबच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. आफताबची पॉलीग्राफी चाचणी मंगळवारी रोहिणी फॉरेन्सिक लॅबमध्ये सुरू झाली. ही प्रक्रिया सुमारे एक आठवडा चालेल. 24 नोव्हेंबरला आफताबची नार्को चाचणी होऊ शकते.