Shraddha Walker Murder Case:'त्याच्या प्रभावाखाली माझ्या हातून हत्या झाली'; आफताबचा मोठा खुलासा, प्रकरण वेगळ्याच वळणावर! By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 08:06 PM 2022-11-18T20:06:53+5:30 2022-11-18T20:20:23+5:30
Shraddha Walker Murder Case: पोलिसांच्या चौकशीदरम्यान आफताब रोज नवीन खुलासे करत आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आफताब रोज नवीन खुलासे करत आहे. आज त्याने पुन्हा एक महत्वाचा खुलासा केला आहे. श्रद्धा आपल्याला नेहमी गांज्याचं व्यसन करत असल्याने ओरडायची. हत्येच्या दिवशी दोघांमध्ये घरखर्च तसंच मुंबईतून दिल्लीत सामान घेऊन कोण येणार यावरुन दिवसभर भांडण सुरु होतं.
या भांडणानंतर आफताब घराबाहेर गेला आणि गांज्याचं सेवन करुन परतला. आपण श्रद्धाची हत्या करणार नव्हतो, पण गांजाचं सेवन केलं, असल्याने त्याच्या प्रभावाखाली आपल्या हातून हत्या झाली, असा नवीन जबाब आता आफताबने दिला आहे. आफताबच्या या जबाबामुळे सदर प्रकरण वेगळ्याच वळणावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांकडे आतापर्यंत असलेले पुरावे- १. आफताबची कबुली २. आफताबने जेथून फ्रिज विकत घेतले, त्या दुकानमालकाचा जबाब आणि बिल ३. जंगलात सापडलेले अवयव आणि किचनमध्ये सापडलेले रक्त ४.आफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून ५४ हजार रुपये काढल्याचा तपशील.
वेब सीरिज पाहिली- श्रद्धा वालकरच्या मृतदेहाची खांडोळी करायला आरोपी आफताब पूनावाला याला सुमारे १० तास लागले. काम संपवून त्याने बीअर आणली, मग नेटफ्लिक्सवर वेब सीरिज पाहिली आणि झोपी गेला.
मैत्रीण फ्लॅटवर- श्रद्धाची हत्या केल्यानंतरही आफताबने एका मैत्रिणीला फ्लॅटवर आणले होते. श्रद्धा फ्लॅटवर नसतानाही तो पूर्वी असे करीत असे. यावरुन दोघांत भांडणे होत होती. पोलीस या मुलीचाही शोध घेत आहेत. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबने त्याचा जुना फोन ओएलएक्सवर विकल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पोलिस हा फोन परत मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.