Shraddha Walker Murder Case: अधिकाऱ्यांचा तो एक प्रश्न अन् आफताब लगेच पाणी मागू लागला; चौकशीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 09:22 AM2022-11-26T09:22:19+5:302022-11-26T09:30:20+5:30

Shraddha Walker Murder Case: आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत.

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याची प्रकृती ठीक नसल्याने रखडलेली पॉलिग्राफ चाचणी गुरुवारी पार पडली. मात्र, त्याला सर्दी झाल्याने, सतत शिंका येत असल्याने ती पूर्ण होऊ शकली नाही. ती शुक्रवारी पुढे सुरु राहिली. कदाचित उद्याही ही चाचणी केली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या चाचणीत आफताब त्याच्या आणि श्रद्धाच्या संबंधांबाबत थोडी परस्परविरोधी माहिती दिल्याने सोमवारच्या चाचणीतील त्याच्या उत्तराकडे लक्ष लागले आहे. आफताबच्या चाचणीसाठी पाचजणांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात दोन मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश आहे, तर दोघे त्याच्या चाचणीच्या तपशीलवार रेकॉर्डिंगवर लक्ष ठेवत आहेत.

रोहिणीच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आफताबची पॉलीग्राफी चाचणी सुरु झाल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. श्रद्धासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारताच तो थोडा अस्वस्थ झाला व पाणी मागू लागला. त्यानंतर आफताबने शांतपणे उत्तरे दिली. त्याच्यावर कोणताही ताण नव्हता, तो शांतपणे चाचणीला सामोरा गेला.

चाचणीत त्याला ४० ते ५० प्रश्न विचारण्यात आले. नियोजित पद्धतीने हत्या केली की रागातून? मृतदेहाचे तुकडे करण्याचा व फेकण्याचा निर्णय का घेतला? मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी कोणत्या शस्त्रांचा वापर केला? शस्त्रे कुठे लपविली? हे प्रश्न त्याला विचारले. हे प्रश्न हिंदीत विचारले आणि त्याने याची इंग्रजीतून उत्तरे दिल्याचेही कळते.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात ती व आफताबच्या मित्रांनी गुरुवारी साकेत न्यायालयात जबाब नोंदविला. आफताब श्रद्धाला मारहाण करायचा, जीवे मारण्याची धमकी द्यायचा. याबाबत श्रद्धाने अनेकदा सांगितले होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, ती त्याला एक संधी देऊ इच्छित होती, असे सांगितले. दरम्यान, एका मित्राने तिला सिगारेटने चटकेही दिले होते.

छत्तरपूर पहाडीच्या जंगलात आडबाजूला आफताबला घर भाड्याने देणारा त्याचा मित्र बद्रीही संशयाच्या भोवऱ्यात असून, पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. याच घराजवळच्या जंगलाच्या भागात श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते, आफताब आणि श्रद्धाची हिमाचल प्रदेशात ब्रदीशी ओळख झाली होती. त्यानंतर ब्रदीने आफताबला घर भाड्याने दिले होते. त्याला हत्येची कल्पना होती, त्याचा सहभाग आहे का याबाबत चौकशी होणार आहे.