तुरुंगात एकटाच तासंतास बुद्धीबळ खेळतो आफताब, पॉलीग्राफ-नार्को टेस्टनंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 11:43 AM2022-12-02T11:43:37+5:302022-12-02T11:52:46+5:30

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाची पोलिसांकडून तासंतास चौकशी सुरू आहे. यात आफताबची पॉलीग्राफ आणि नार्को चाचणी देखील झाली आहे. पण प्रत्येकवेळी त्यानं मोठ्या हुशारीनं प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तर काही प्रश्नांना सोयीस्कर बगल देखील दिली आहे.

पोलिसांना चौकशीत कोणतीच नवी माहिती मिळू शकलेली नाही. चौकशीवेळी आफताब कमालीचा शांत पाहायला मिळाला. त्याच्या चेहऱ्यावर त्यानं केलेल्या गुन्ह्याचा कोणताही लवलेश पाहायला मिळत नव्हता. तो अत्यंत संयमी आणि शांत पद्धतीनं चौकशीला सामोरा गेला. तसंच विचारपूर्वक उत्तरं देत होता.

आता आफताबच्या छंदाशी निगडीत एक माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आफताबला बुद्धीबळ खेळायला आवडतं. तिहार तुरुंग प्रशासनाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॅरेक क्रमांक-४ मध्ये कैद असलेला आफताब आपला वेळ व्यतित करण्यासाठी तासंतास बुद्धीबळ खेळत राहतो. तो आपल्या बॅरेकमध्ये एकटाच बुद्धीबळाचा खेळ मांडतो आणि तासंतास विचार करत बसतो.

आफताबची १ डिसेंबरला नार्को चाचणी झाली पण पोलिसांच्या हाती काहीच खास लागलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार त्यानं नार्को चाचणीतही काहीच सांगितलं नाही. त्यानं आतापर्यंत जेही काही पोलिसांना सांगितलं आहे त्यावर तो नार्को चाचणीतही ठाम दिसला.

आज आफताबचा पोस्ट नार्को टेस्ट इंटरव्ह्यू होणार आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगातच ही चाचणी होणार आहे. या चाचणीतून नवा पुरावा हाती लागेल अशी पोलिसांना आशा आहे. आज सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही चाचणी होणार आहे.

पोस्ट नार्को टेस्ट इंटरव्ह्यूसाठी FSL चे चार अधिकारी आणि श्रद्धा हत्याकांड प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी तिहार तुरुंगात आफताब जवळ जातील. यात आफताबचं काउन्सलिंग केलं जाईल. यात तर तज्त्रांना योग्य उत्तरं न मिळाल्यास आफताबची पुन्हा एकदा चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.

नार्को चाचणीत आफताबनं श्रद्धाची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. श्रद्धाचा फोन कुठं आहे असं विचारलं असता आफबातनं तो कुठंतरी फेकून दिला एवढंच म्हटलं. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं पोलिसांसमोर कबुल केलं आहे. पोलीस आता याप्रकरणात पुरावे गोळा करत आहे. कारण कोर्टात पुराव्यांच्या जोरावर आफताबला कठोर शिक्षा करता येणार आहे.

नार्को चाचणीत आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी हत्यार वापरल्याचीही कबुली दिली आहे. या हत्याकांडात आणखी कुणी सामील होतं का याबाबत विचारलं असता आफताबनं त्यानं स्वत: एकट्यानं हे कृत्य केल्याचं मान्य कलं आहे. या हत्याकांडात इतर दुसरं कुणीच सामील नव्हतं असं आफताबनं म्हटलं आहे.

श्रद्धाचा खून करुन तिच्या शरीराचे तुकडे जंगलात टाकल्याचंही नार्को चाचणीत आफताबनं कबुल केलं आहे. पोलिसांसमोर आफताब आपल्या गुन्ह्याची कबुली देत असला तरी केवळ हेच पुरेसं नाही. कारण पोलिसांकडे अद्याप कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. आफताबनं नार्को चाचणीती दिलेली माहिती केवळ एक चौकशीचा हातभार देणारा भाग ठरू शकतो. ज्यामाध्यमातून पोलिसांना पुरावे गोळा करण्यात मदत होऊ शकते.