महाठग सुकेशने जॅकलीनला दिले होते कोट्यावधी रूपयांचे गिफ्ट, वाचा अभिनेत्रीने ईडीला काय सांगितलं? By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 05:21 PM 2021-12-18T17:21:55+5:30 2021-12-18T17:31:01+5:30
Sukesh Chandrashekhar Case : जॅकलीनने (Jacqueline Fernandez) ईडीला सांगितलं की, तिला चंद्रशेखरने अनेक महागडे गिफ्ट्स दिले. सोबतच हेही सांगितलं की, तिला चंद्रशेखरच्या खऱ्या चेहऱ्याबाबत माहीत नव्हतं. महाठग सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandrashekhar) संबंधित फसवणुकीच्या केसप्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) ईडीकडून चौकशी केली जात आहे. तिच्या चौकशीतून अनेक खुलासे झाले आहेत. दोघांच्या अफेअरची चर्चा असताना तिने ईडीला दिलेली माहिती समोर आली आहे. जॅकलीनने ईडीला सांगितलं की, तिला चंद्रशेखरने अनेक महागडे गिफ्ट्स दिले. सोबतच हेही सांगितलं की, तिला चंद्रशेखरच्या खऱ्या चेहऱ्याबाबत माहीत नव्हतं. ती म्हणाली की, सुकेशशी भेट झाली तेव्हा त्याने त्याची ओळख शेखर वेला नावाने करून दिली होती.
न्यूज18 एका वृत्तानुसार, सुकेश चंद्रेशखर आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल हिला मनी लॉंन्ड्रींग प्रकरणी नुकतीच अटक केली. त्यांच्यावर दिल्लीतील तिहार तुरूंगातून खंडणीचं रॅकेट चालवण्याचा आरोप आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांना अभिनेत्री जॅकलीनने सांगितलं की, तिला पहिल्यांदा चंद्रशेखरबाबत २०२१ च्या सुरूवातीला समजलं होतं. तिला कुणाचातरी कॉल येत होता. फर्नांडिस म्हणाली की, तिचा मेकअप आर्टिस्ट शान मुतशिलने तिला फोन उचलण्यास सांगितलं. कारण त्याला एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडून असं करण्यास सांगण्यात आलं होतं. ती म्हणाली की, महाठगने त्याचं नाव शेखर रत्न वेला असल्याचं सांगितलं होतं.
जॅकलीनने अधिकाऱ्यांना सांगितलं की, 'मी सुखेश चंद्रशेखरला ओळखत नाही. मी त्याला केवळ शेखर रत्न वेला म्हणून ओळखते. त्याने त्याचा परिचय शेखर वेला म्हणून करून दिला होता'.
जॅकलीनने सांगितलं की, शेखरने दावा केला होता की, तो सन टीव्हीचा मालक आहे आणि तो तामिळनाडुच्या माजी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा नातेवाईक आहे.
ती म्हणाली की, 'शेखरने मला सांगितलं की, तो तिचा मोठा फॅन आहे. तो मला म्हणाला की, मी साऊथमध्ये सिनेमे करायला हवे आणि सन टीव्ही सिनेमा प्रोड्यूस करत आहे. मी फेब्रुवारीपासून त्याच्या संपर्कात आली होती. त्याने मला त्याचा नंबर दिला. आणि त्या नंबरवर कॉल करण्यास सांगितलं.
पैशांच्या देवाण-घेवाणीबाबतही अभिनेत्रीने काही माहिती दिली. ती म्हणाली की, ठगाने अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या बहिणीला १ लाख ५० हजार डॉलरचं लोन दिलं होतं.
त्यासोबतच तिने सांगितलं की, सुकेशने ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या तिच्या भावाला १५ लाख रूपये ट्रान्सफर केले होते. ती म्हणाली की, ती २००९ पासून भारतात राहत आहे. तिचा आणखी एक भाऊ रेयान ऑस्ट्रेलियात राहतो. तर तिचे आई-वडील एलरी आणि किम फर्नांडिस बहरीनमध्ये राहतात.
जॅकलीनने तिला चंद्रशेखरने काय काय गिफ्ट दिले याचीही माहिती दिली. यात त्याने तिला एस्पुएला नावाचा घोडा, गूची आणि शनैलच्या तीन डिझायनर बॅग्स, दोन गूची जिमवेअर, लुई विंतोचे शूज, दोन जोडी डायमंड ईअररिंग्स, ब्रेसलेटसहीत आणखीही काही वस्तूंचा समावेश आहे.
जॅकलीन म्हणाली की, चंद्रशेखरने तिला एक मिनी कूपर कार गिफ्ट केली होती. पण ती तिने त्याला परत दिली होती. अभिनेत्रीला मिळालेल्या गिफ्ट्सची यादी ईडीच्या चार्जशिटमध्ये आहे. चार्जशीटमध्ये सांगण्यात आलं की, चंद्रशेखरने अनेक वेळा फर्नांडिससाठी प्रायव्हेट जेट्स आणि हॉटेलची व्यवस्था केली होती.
त्यासोबतच चार्जशीटमध्ये नोरा फतेहीला मिळालेल्या गिफ्ट्सचीही माहिती आहे. ईडीने नोराचीही चौकशी केली. ईडीने दावा केला की, चंद्रशेखरने फतेहीला डिसेंबर २०२० मध्ये बीएमडब्ल्यू कार गिफ्ट केली होती. नंतर ७५ लाख आणि काही महागडे गिफ्ट दिले होते.