यशश्री शिंदेंच्या हत्येचं रहस्य उलगडलं; जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 02:27 PM2024-08-02T14:27:03+5:302024-08-02T14:36:47+5:30

आधी रहस्यमयरित्या मुलगी गायब झाली, त्यानंतर काही तासांनी तिचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडतो. त्यानंतर ३ दिवसांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी दिसते, तिचा पाठलाग करणारा एक अज्ञात मुलगाही दिसून येतो. त्यानंतर यशश्री शिंदे हत्याकांडाचं सत्य समोर आलं जे ऐकून कुणीही हैराण होईल.

यशश्री शिंदेंच्या हत्येमागील अशी कहाणी पुढे आली आहे ज्याचा विचार पोलिसांनी केला नव्हता. लोकांच्या नजरेपासून लपवून सीक्रेट रिलेशनशिपमध्ये राहणं यशश्रीच्या जीवावर बेतलं. या घटनेतील आरोपी दुसरं कुणी नसून तिचं सीक्रेट लव्ह होतं, ज्याच्यावर ती विश्वास ठेवायची. खासगी कंपनीत डेटा एंन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या २० वर्षीय यशश्री शिंदेंची हत्या झाली. २५ जुलैला ती घराबाहेर पडली होती त्यानंतर पुन्हा परतलीच नाही. घरच्यांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली, त्यानंतर पोलीस तपासात निर्जनस्थळी तिचा मृतदेह सापडतो

या मृतदेहाची अवस्था बिकट होती, चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर जखमा होत्या. शरीरावर चाकूने हल्ला केल्याच्या खूणाही आढळल्या. घरच्यांच्या संशयावरून दाऊद शेख हे नाव पुढे आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलीचा पाठलाग करणारा दाऊद शेखच होता हे निष्पन्न झालं. त्यानंतर या दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले तर दोघे एकमेकांच्या संपर्कात होते हे पुढे आले.

यशश्रीची हत्या करून दाऊद नवी मुंबईतून गायब झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कर्नाटकातून दाऊदच्या मुसक्या आवळल्या. गुलबर्गातून त्याला अटक करून आणलं, चौकशीत दाऊदनं यशश्रीचा खून केल्याचं कबूल केले. मात्र हत्येमागचं कारण जे सांगितले त्यामुळे पोलीसही अवाक् झाले.

यशश्री आणि दाऊद हे एकमेकांना शालेय दिवसापासून ओळखत होते. दोघेही रिलेशनमध्ये होते. मात्र त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तिच्या घरच्यांनी दाऊदविरोधात तक्रार दिली. त्याला जेलमध्ये पाठवले. तेव्हापासून त्याचा यशश्रीची संपर्क तुटला होता.

दाऊद जेलमधून परतताच तो पुन्हा यशश्रीच्या संपर्कात आला. आता दाऊद त्याच्या हिशोबाने या नात्याला पुढे घेऊन जाणार होता. दाऊदला यशश्रीला घेऊन बंगळुरूला जायचं होतं. परंतु यशश्री त्यासाठी तयार नव्हती. दाऊद यशश्रीवर त्यासाठी दबाव टाकत तिला ब्लॅकमेल करत होता.

दाऊदजवळ यशश्रीचे काही जुने प्रायव्हेट फोटो होते, जे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी तो देत होता. घटनेच्या आधी दाऊदने यशश्रीला भेटायला बोलावले. परंतु ती तयार नव्हती. तेव्हा दाऊदने त्याचे आणि यशश्रीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

दाऊदनं फोटो पोस्ट केल्यानंतर यशश्री घाबरली, त्याने दाऊदला फोन करत फोटो डिलीट करण्याची विनंती केली. त्यावर जर तू मला भेटायला येत असशील तर त्याच अटीवर फोटो डिलीट करेन असं दाऊद म्हणाला. त्यानंतर यशश्री त्याला भेटण्यास तयार झाली, त्यानंतर दाऊदनं सोशल मीडियावरून ते फोटो डिलीट केले.

२५ जुलैला यशश्री दाऊदला भेटण्यासाठी निघाली, तिने ऑफिसमधून हाफ डे घेतला होता. त्यानंतर ती मैत्रिणीच्या घरी गेली. तिथून दाऊदशी संपर्क साधला, त्यानंतर कोटनाका दिशेने ती गेली, हीच तिच्या आयुष्यातील मोठी चूक ठरली. कारण दाऊद आज तिला संपवण्याच्या तयारीत होता.

कोटनाका इथं दोघांमध्ये रिलेशनशिपवरून वाद झाले, दाऊदनं तिला बंगळुरूला येण्यास सांगितले. मात्र यशश्री तयार नव्हती. दाऊदनं त्याच्या मोबाईलमधून दोघांचे फोटो डिलीट करावेत असं यशश्री म्हणत होती. यशश्रीचा नकार दाऊदला आवडला नाही. त्यानंतर अचानक दाऊदनं तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि तिचा जीव घेतला.