Shraddha murder case : नार्को टेस्टच्या आधी पॉलिग्राफ चाचणी का ? काय आहे दोन्हीमधील फरक ? By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:23 PM 2022-11-22T13:23:40+5:30 2022-11-22T13:27:42+5:30
श्रद्धा हत्याकांडामुळे सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे नार्को टेस्ट. आणि आता पॉलिग्राफ चाचणी. आरोपी आफताबची नार्को टेस्ट काल रद्द झाली कारण न्यायालयाकडून पॉलिग्राफ चाचणीची परवानगी मिळाली नाही. मात्र नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ चाचणीत नेमका फरक काय आहे बघुया. नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे डॉक्टर राजकुमार सांगतात, नार्को टेस्ट पॉलिग्राफ चाचणी पेक्षा खूप वेगळी आहे. नार्को टेस्टमध्ये आरोपीला एक इंजेक्शन दिले जाते. यामध्ये सोडियम पेंटोथॉल असते. इंजेक्शनद्वारे ते शरीरात गेल्यानंतर मेंदुची कल्पनाशक्ती कमी होत जाते. त्यामुळे अशा परिस्थितीत विचारल्या गेलेल्या प्रश्नांना तो व्यक्ती घुमवू शकत नाही. कोणत्याही घटनेवर विचारल्यावर तो व्यक्ती सरळ सरळ उत्तर देतो.
पॉलिग्राफ चाचणी काय आहे याबाबत डॉ राजकुमार सांगतात, तुमच्या शारीरीक क्रियांमधून व्यक्ती खरे बोलत आहे की खोटे हे तपासता येते. यालाच लाय डिटेक्टर चाचणी म्हणतात. एखादी व्यक्ती खोटं बोलली तर रक्तदाब, श्वासोच्छवास आणि शरीराचे तापमान यात बदल होतात. हे बदल या चाचणीमुळे स्पष्ट होतात.
आरोपीची नार्को टेस्ट करण्यापुर्वी पॉलिग्राफ चाचणी केली जाते. व्यक्तीच्या शरीरातील बदल प्रथम समरुन घेतले जातात. ती यशस्वी झाली तरच पुढे नार्को टेस्ट करता येते.
सर्वोच्च न्यायालयाने या चाचण्यांबाबत सेल्वी विरुद्ध कर्नाटक राज्य आणि एएनआर प्रकरणात निर्णय दिला होता. आरोपीच्या संमतीशिवाय कोणतीही लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात येऊ नये. तसेच चाचण्यांचे अहवाल कबुलीजबाब म्हणुन वापरता येणार नाही. मात्र यामध्ये मिळालेली माहिती पुरावा म्हणुन दाखवली जाऊ शकते.
डीके बसू विरुद्ध पश्चिम बंगाल या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने या चाचण्या क्रुर आणि अमानुष असल्याचे म्हणले होते. यामुळे गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन होऊ शकते असे सांगितले.