फोन टॅपिंग म्हणजे काय रे भाऊ? तुमचा मोबाईल कोण अन् कोणत्या कारणासाठी टॅप होऊ शकतो जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 03:15 PM 2021-05-05T15:15:49+5:30 2021-05-05T15:58:26+5:30
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी काही राजकीय मंडळींचे फोन टॅप केल्याचं प्रकरण महाराष्ट्रात खूपच चर्चेचा विषय बनला आहे. तसेच मुंबई Phone Tapping : पोलिसांच्या सायबर सेलने ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि चौकशीसाठी दोनवेळा समन्स देखील बजावले. मात्र, शुक्ला यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्रात गाजत असलेल्या या फोन टॅपिंग प्रकरणामुळे तुमच्या मनात देखील फोन टॅपिंग म्हणजे काय? फोन टॅप कोण करू शकतो? फोन टॅप कोणत्या कारणांसाठी केले जातात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. म्हणून त्याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती. फोन टॅपिंग पूर्वी लँडलाईनच्या काळात अत्यंत सोपं होतं. रेडिओ स्कॅनरच्या मदतीने सहजपणे फोन टॅप केला जात असे. रेडिओ स्कॅनर अनेक प्रकारच्या फ्रिक्वेन्सीमध्ये काम करण्यास सक्षम असायचा. त्यामुळे टेलिफोनवर होणारी चर्चा रेडिओ स्कॅनरमध्ये लावण्यात आलेल्या मायक्रोफोनच्या मदतीने ऐकणं शक्य होतं. आता स्मार्टफोन कोणत्याही लाईनवर नाही तर ट्रान्समिशन आणि डिजीटल एन्कोडिंगवर आधारीत आहे. त्यामुळे स्मार्टफोनवरील संभाषण टॅप करणं कोणत्याही बाहेरच्या व्यक्तिला शक्य नाही. केवळ टेलिकॉम कंपन्याच फोन टॅप करू शकतात. तेही सरकारचे आदेश असतील तरच.
कोणत्या कारणांसाठी फोन टॅपिंग केले जाते? - देशाची एकता आणि अखंडता, सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी, परकीय देशासोबत मैत्रीचे संबंध, जनतेमध्ये शांतता राखण्यासाठी आणि एखादा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी (उदा. खंडणी, दरोडा, दहशतवादी कारवाया इत्यादी) आदी कारणांसाठी फोन टॅप केले जातात. या व्यतिरिक्त इतर कारणांसाठी फोन टॅप करू नयेत, असे आदेशच गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी दिले आहेत.
कोण करू शकतात फोन टॅप? - मुंबई गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र एटीएस आणि लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या तीन विभागाला फोन टॅप करण्याचे अधिकार आहेत. हे तिन्ही विभाग सलग सहा ते सात दिवस कुणाची रेकी करू शकतात. त्यापुढे त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) यांची परवानगी घ्यावी लागते.
फोन टॅपिंग गुन्हा आहे का? - हो, हा गुन्हा आहे. म्हणून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सायबर सेलने गुन्हा दाखल केला आहे. अर्थातच त्याबाबत चौकशी अजून बाकी आहे. गृह विभागाची परवानगी नसताना फोन टॅपिंग करणं हा गुन्हा आहे. वरील यंत्रणांव्यक्तिरिक्त कुणालाही कुणाचा फोन टॅप करता येत नाही. जर एखादी व्यक्ती असं कृत्य करत असेल तर तो खडी फोडायला तुरुंगात जाऊ शकतो. तसेच वरील एजन्सीही देशद्रोह किंवा गंभीर गुन्ह्याचा संशय असलेल्या व्यक्तिंचाच फोन टॅप करतात. अन्य कुणाचाही फोन टॅप करण्याची त्यांना परवानगी नाही. कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे कुणाचाही फोन टॅप केला जात नाही.
फोन टॅप होतो हे कसं कळत ? - फोनवर कोणतीही महत्त्वाची चर्चा करताना सावध राहा. बॅकग्राऊंडला येणाऱ्या आवाजावर लक्ष ठेवा, तुमचा फोन इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आसपास घेऊन जा, तुमच्या फोनमध्ये आपोआप होणाऱ्या अॅक्टिव्हीटीकडे लक्ष द्या, फोनची बॅटरी कारणांशिवाय गरम होत असेल तरीही लक्ष द्या, तुमच्या फोनचे बिल बारकाईने वाचा, फोनचा डेटा यूजेस वारंवार चेक करत राहा, डेटा अधिक वापरला तर जात नाही ना याकडे लक्ष द्या. तसेच एखाद्या रँडम नंबर, टेक्स्ट आणि सिम्बॉलवाले मेसेज तर येत नाही ना, याकडे देखील लक्ष ठेवा.
किती वर्षाची शिक्षा? - एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या कुणाचा फोन टॅप केला आणि त्याच्याविरोधात पुरावे सिद्ध झाल्यास त्याला तीन वर्षाची शिक्षा होऊ शकते. तसेच आर्थिक दंडाचीही तरतूद आहे.
काय आहे पेगॅसिस स्पायवेअर सॉफ्टवेअर ? - पेगॅसिस हे एक स्पायवेअर सॉफ्टवेअर आहे. जे इस्राईलच्या सायबरआर्म फर्मच्या या संस्थेने तयार केले आहे. हे सॉफ्टवेअर आयफोन आणि अँन्ड्रॉईड या दोघांमध्ये इन्स्टॉल होतं. या सॉफ्टवेअरचा दुरुपयोग करून दुसऱ्यांचे टेक्स्ट मॅसेज आणि फोन टॅप केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे या सॉफ्टवेअरचा दुरुपयोग करून दुसऱ्यांच्या फोनमधील कॅमेरा आणि मायक्रोफोनममध्ये असेलली माहिती मिळवली जाऊ शकते. या स्पायवेअर सॉफ्टवेअरची निर्मिती दहशतवादी कारवायांचा आणि गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी तयार केला गेला असं इस्राईलच्या सायबरआर्म फर्म संस्थेने सांगितलं. ऍपल आयफोनच्या 9.3.5 व्हर्जनमध्ये याबद्दलची सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र, अँड्रॉइड फोनसाठी अशा प्रकारची सुरक्षा अद्याप देण्यात आलेली नाही.
कसं होतं टॅपिंग ? - कोणत्याही माहित नसलेल्या लिंकवर क्लिक करू नका, आपण अनेकदा अशा चुकीच्या लिंकवर क्लिक करतो आणि आपलं फेसबुक, बँक अकाउंट किंवा ईमेल हॅक झाल्याचं आपल्याला नंतर समजतं. असाच काहीसा प्रकार यातही वापरण्यात येतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला एक लिंक पाठवली जाते, त्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या मायक्रोफोन, कॅमेरा, मेसेजेस, बँकेचे डिटेल्स, ईमेल या सर्वांचा ऍक्सेस हॅकर्स किंवा फोन टॅपिंग करणाऱ्यांकडे जातो.
अरब ह्युमन राइट्सचे अहमद मंसूरी यांना एक टेक्स्ट मॅसेज आला होता. मंसूरी यांना त्या मॅसेजमध्ये एक लिंक देखील आली होती. मंसूरी यांना त्या मॅसेजचा संशय आला आणि त्यांनी तो मॅसेज सिटीझन लॅबला पाठवला. लॅबने या मॅसेज आणि लिंकचा शोध पाडला. या तपासात हा मॅसेज स्पाय असल्याचं सांगण्यात आलं. यदाकदाचित मंसूरी यांनी ती लिंक उघडली असती तर त्यांचा फोन, मॅसेज आणि इतर माहिती टॅप होण्याची शक्यता होती, अशी माहिती ईसकाळने दिली आहे.