कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 06:18 PM2024-10-14T18:18:15+5:302024-10-14T18:26:46+5:30

पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील शंकर गावचा रहिवासी मोहम्मद जसीन अख्तर बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी आहे. अख्तर याच्यावर याआधीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात हत्या, लूट, शस्त्रांची चोरी अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे अशी माहिती डीसीपी सुखपाल सिंग यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जसीन अख्तर याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ९ हून अधिक गंभीर गुन्हे आहेत. या गुन्ह्यांची दखल घेत पंजाबशिवाय हरयाणातही त्याच्याविरोधात कारवाई केली जात होती. २०२२ मध्ये जसीन अख्तरला पहिल्यांदा जालंधर पोलिसांनी अटक केली होती, तेव्हापासून तो त्याच्या गावात परतला नाही.

जसीन अख्तरचं नाव बाबा सिद्दीकी हत्याकांडात पुढे येताच पोलीस अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढलेली आहे. बाबा सिद्दीकी हत्याकांडात मुंबई पोलीस तपासात महत्त्वाची भूमिका निभावत आहेत, त्यांनी जसीन अख्तरबाबत अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळवले आहेत.

नुकतेच मुंबई पोलिसांच्या एका पथकाने जालंधर येथे दौरत करत तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास प्रक्रिया पुढे नेली आहे. जसीन अख्तर याच्या गुन्ह्याची मालिका पंजाबपासून हरियाणातील अनेक भागात पसरली आहे. ज्यातून त्याच्यामागे गुन्हेगारी क्षेत्रातील मोठं नेटवर्क हाती असल्याचं समोर आले.

पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, जसीन अख्तर हा लॉरेंस बिश्नोई गँगशी जोडलेला आहे. जसीननं विक्रम बराडच्या सांगण्यावरून पंजाबमध्ये २ डेरा प्रेमी युगलांची रेकी केली होती. जसीन अख्तर थेट लॉरेंस बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या संपर्कात राहायचा आणि विशेष APP च्या माध्यमातून तो त्याच्याशी संवाद साधायचा.

मोहम्मद जसीन अख्तरचे संबंध पुण्यातील गँगस्टर सौरभ महाकालशीही आहेत. सौरभ महाकाल हा तोच आहे ज्याची मुंबई पोलिसांनी सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र पाठवण्याबाबत चौकशी केली होती. बाबा सिद्दीकीची हत्या करण्यासाठी आलेला जसीन अख्तर हा पुण्यातील सौरभ महाकालच्या घरीच थांबल्याची माहिती आहे.

एकेकाळी महाराष्ट्रातील गँगस्टर अरुण गवळीचा शार्प शूटर असलेला हा गुन्हेगार सौरव महाकाल सध्या लॉरेन्स बिश्नोईसोबत (Lawrence Bishnoi) काम करतो. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्या प्रकरणातही सौरव महाकालचे नाव पुढे आले होते. त्याला अटकही झाली होती, पण नंतर सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

जसीन अख्तरनं गोळीबार करणाऱ्या आरोपींना बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाची माहिती दिली होती. यासोबतच मोहम्मद जसीननं आरोपींसाठी भाड्याने खोली घेण्यासोबत अनेक गोष्टींमध्ये मदत केली होती. दोन वर्षांपूर्वी मोहम्मद जसीन अख्तरला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. पतियाळा तुरुंगात असताना त्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांची भेट घेतली होती. सुटका झाल्यानंतर तो मुंबईला गेला.

बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील खेरवाडी सिग्नलजवळील निर्मल नगर भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या या सिद्दीकी यांना लागल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंस बिश्नोई टोळीने घेतली असली तरी या हत्येच्या तळापर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे त्यांची सलमान खानसोबतची मैत्री आहे की आणखी काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या हत्येमागे एसआरए पुनर्विकासाचा मुद्दाही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.