"हवे तितके पैसे घे, पण माझ्या नवऱ्याला संपव; गोळ्या घालतानाचे आवाज मला मोबाईलवर ऐकव"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 06:25 PM2020-07-14T18:25:25+5:302020-07-14T18:37:08+5:30

पती आणि पत्नीचं नात अतिशय पवित्र असतं. रक्ताचं नसलं तरी या नात्यात खूप मोठी ताकद असतं. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दोघांनी एकमेकांना दिलेलं असतं. मात्र दोघांमधील एखादा जरी चुकीचा वागला, त्यानं दुसऱ्याशी प्रतारणा केली तर परिणाम भयंकर होतात. बिहारच्या बाढमध्ये अशीच एक घटना घडली.

जन्मोजन्मी साथ देण्याचं वचन देणाऱ्या पत्नीनं पतीची हत्या घडवून आणल्याचा प्रकार बिहारमध्ये घडला आहे. प्रियकराच्या मदतीनं तिनं पतीच्या हत्येची योजना आखली. यासाठी तिनं सव्वा तीन लाख रुपयांची सुपारी दिली.

बिहारच्या बाढ जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ माजली आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या हत्या प्रकरणी पोलिसांनी पत्नी शोभा देवी आणि सहा आरोपींना अटक केली आहे.

शोभा गुप्तानं तिच्या प्रियकराच्या मदतीनं पावरग्रीडमध्ये काम करणारा पती पंकज गुप्ताच्या हत्येची सुपारी दिली. पतीला गोळ्या घालून संपवा आणि त्याच्यावर गोळ्या झाडत असतानाचे आवाज मला मोबाईलवर ऐकवा, अशा सूचना तिनं सुपारी दिलेल्या व्यक्तींना केल्या होत्या.

८ जुलैला सकाळी लवकर पंकज गुप्ता क्वार्टर्समधून बाहेर पडताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्याचा मृत्यू झाला. पंकजवर झालेल्या गोळीबाराचा आवाज शोभा मोबाईलवर ऐकत होती.

पोलिसांनी पंकजच्या हत्येप्रकरणी त्याच्या कुटुंबीयांची आणि पत्नीची चौकशी सुरू केली. त्यातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या.

पोलिसांनी चारच दिवसांमध्ये प्रकरणाचा छडा लावला आणि शोभासह तिचा प्रियकर आणि ७ जणांना अटक केली. पंकजवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल आणि सुपारी म्हणून देण्यात आलेली रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

पंकजची पत्नी शोभाचे एका सन्नी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. याची कुणकुण पती पंकजला लागली. त्यानंतर सन्नी आणि शोभानं पंकजचा काटा काढण्याची योजना आखली.

हवे तितके पैसे देते, पण पंकजला संपव, असं शोभानं सन्नीला सांगितलं. यासाठी शोभानं सुपारी घेतलेल्यांना ५० हजार रुपये आगाऊ दिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

उरलेले पावणे तीन लाख शोभा नंतर देण्यात होणार होती. याशिवाय तिनं सुपारी घेणाऱ्यांना एक कोरा चेकदेखील दिला होता.

८ जुलैला पंकज क्वार्टर्समधून सकाळी दूध आणण्यासाठी बाहेर पडताच शोभा देवीनं हल्लेखोरांना अलर्ट दिला. तिनं पंकजचं वर्णन मोबाईलवरून सांगितलं.

हल्लेखोर पंकजवर गोळ्या झाडत असताना शोभानं फोन सुरूच ठेवला होता. पंकजवर झाडल्या जाणाऱ्या गोळ्यांचे आवाज ती मोबाईलवरून ऐकत होती. हल्लेखोरांच्या गोळीबारात पंकजचा जागीच मृत्यू झाला.