दाऊद इब्राहिमचा 'हा' फोटो तर पाहिला असेलच, माहितीये का या फोटो मागची कहाणी?
By पूनम अपराज | Updated: February 20, 2021 21:07 IST2021-02-17T19:25:34+5:302021-02-20T21:07:47+5:30
Underworld Don Dawood Ibrahim's Photo : १९९३ साली मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर तो जगातल्या अनेक सुरक्षा यंत्रणांच्या हिटलिस्टवर आला असा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम म्हणजे दाऊद कासकर. १९९३ भीषण बॉम्बस्फोटांनंतर तो गायबच झाला. आता तो पाकिस्तानात असतो. पाकिस्तान सरकारने त्याला आसरा दिलाय. काही जणाच्या मते, त्याने स्वतःची प्लस्टिक सर्जरी केली आहे. मात्र, या कुख्यात गुंडाला आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आणि सगळ्या जगासमोर आणणारा छायाचित्रकार आहेत भवन सिंग.

दाऊदच्या मुलीचे लग्न प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियादादच्या मुलाशी झाले आहे. या लग्नसोहळ्याला दाऊदला पकडण्यासाठी भारतीय गुप्तचर यंत्रणेने सापळा देखील रचला होता. मात्र तो स्वत: च्या मुलीच्या लग्नाला सुद्धा आला नाही.
आजच्याघडीला पाकिस्तानी बिळात लपलेल्या दाऊदचा फोटो टिपणं हे दुर्मिळ आणि अशक्य कोटीतली गोष्ट आहे. मात्र बॉम्बस्फोट प्रकरणापूर्वी काढण्यात आलेले त्याचे काही जुने फोटो प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यापैकी सगळ्यात फेमस फोटो म्हणजेभवन सिंग यांनी टिपलेला पिवळ्या टीशर्टमधला दाऊदचा फोटो. त्याकाळी देखील दाऊदचा फोटो काढण आव्हानचं होतं. मात्र ही किमया घडवून आणली होती ती एका धाडसी फोटोजर्नालीस्टने अर्थातच भवन सिंग यांनी.
१९८५ साली भारत-पाकिस्तान दरम्यानची शारजा सिरीजमधील मॅच सुरु होती. हा हाय व्होल्टेज गेम पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशामधून हजारो फॅन्स या शारजामध्ये दाखल झालेले होते. तसेच हा भव्य सामना कव्हर करायला अनेक देशांचे पत्रकार आणि फोटोग्राफर सुद्धा हजर झाले होते. या माध्यमांच्या चमूत इंडिया टुडेचे फोटोजर्नालिस्ट भवन सिंग हे देखील होते.
भवन सिंग यांच्याजवळ दोन केमेरे होते, एक कॅमेरा मैदानाच्या दिशेने ट्रायपॉडवर लावून ठेवण्यात आला होता. तर दुसरा त्याच्या गळ्यात होता. क्रिकेट मॅच सुरु असताना अचानकपणे जवळच्या स्टॅन्डमध्ये काहीतरी गडबड सुरू असल्याचं जाणीव त्यांना झाली.
कुणीतरी 'दाऊद, दाऊद... असं कुजबुजत असल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. ट्रायपॉडवरचा कॅमेरा तसाच सोडून फक्त गळ्यातला कॅमेरा सोबत घेऊन ते आवाजाच्या दिशेने गेले. भवन सिंग यांनी कधीही दाऊदला पाहिलेलं नव्हतं. ना कधी त्याचा फोटो बघण्यात आला होता. त्यामुळे गर्दीमध्ये दाऊद नेमका कोणता असा प्रश्न त्यांना पडला. मात्र, त्याचा थाटमाट पाहून दाऊद अखेर कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपला गेला. पिवळा गोल गळ्याचा टीशर्ट घातलेला दाऊद. डोळ्यावर स्टाईलिश गॉगल आणि सिगारेट ओढत आजूबाजूला उभे असलेले दाऊदचे साथीदार त्यांच्या नजरेस पडले.