UPSC परीक्षा पास केल्यानंतर किती दिवसांनी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती मिळते? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 06:11 PM 2024-04-17T18:11:22+5:30 2024-04-17T18:16:32+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. UPSC CSE : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. काल(दि.16) UPSC CSE 2023 चा निकाल जाहीर झाला. यावेळी एकूण 1016 उमेदवार पास झाले. त्यापैकी 664 पुरुष आणि 352 महिला उमेदवार आहेत. निकालानंतर प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्यांना लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (LBSNAA) येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल. इथे त्यांना संपूर्ण प्रशिक्षण दिले जाईल.
फाऊंडेशन कोर्समध्ये प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याला प्रशासन, समाज, देशाचे राजकारण, अर्थव्यवस्था इत्यादींची प्राथमिक माहिती दिली जाते. यासोबतच नागरी सेवांच्या आव्हानांची ओळखही करुन दिली जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे प्रशिक्षण फाऊंडेशन कोर्समध्ये केले जाते. फाउंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर, फेज-1 प्रशिक्षण सुरू होते. त्याची सुरुवात ‘भारत दर्शन’ ने होते.
प्रशिक्षणाची सुरुवात भारत दर्शन: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेगवेगळ्या गटात विभागले जातात आणि त्यांना भारत दर्शनासाठी पाठवले जाते. यातून त्यांना देशाच्या संस्कृती, सभ्यता आणि वारसा जाणता येतो. यात त्यांना देशातील सर्व मोठ्या व्यक्तिमत्त्वांना भेटता येते. जसे राष्ट्रपती, पंतप्रधान इ...यानंतर, त्यांना थोड्या काळासाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये पाठवले जाते, जिथे त्यांना तेथील कामकाजाची सखोलपणे माहिती मिळते. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांना आठवडाभर लोकसभा सचिवालयातदेखील प्रशिक्षण दिले जाते.
अॅकेडमिक मॉड्यूल: भारत दर्शन झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी IAS LBSNAA मध्ये परत येतात, जिथे 4 महिन्यांचे शैक्षणिक प्रशिक्षण सुरू होते. यात त्यांना धोरण आखणे, जमीन व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन, राष्ट्रीय सुरक्षा, ई-गव्हर्नन्स अशा सर्व विषयांची सखोल माहिती दिली जाते. मसुरी प्रशिक्षण संस्थेत आयएएस प्रशिक्षणार्थीचा दिवस सकाळी 6 वाजता सुरू होतो.
जिल्हा प्रशिक्षण: शैक्षणिक विभागानंतर प्रशिक्षणार्थी IAS यांना जिल्हा प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. तिथे ते एक वर्ष घालवतात. यावेळी दिलेल्या जिल्ह्यात राहून ते तेथील विविध विभागांसोबतच्या प्रशासकीय कामकाजापासून जिल्ह्य़ातील आव्हाने आणि त्यावरील उपाय अधिक बारकाईने समजून घेतात. हे एक प्रकारे व्यावहारिक प्रशिक्षण आहे.
दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण: जिल्हा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी IAS पुन्हा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत परततात. येथे त्यांचे फेस टू फेस प्रशिक्षण होते. यात त्यांना जिल्ह्यातील प्रशिक्षण अनुभव, आव्हाने इत्यादी सांगावे लागते. या टप्प्यात विशेष सत्रांचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये विविध विषयातील तज्ञ त्यांना प्रशिक्षण देतात.
जिल्हाधिकारी कधी होणार? 2 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थी IAS कायमस्वरुपी IAS अधिकारी बनतात. यानंतर विविध राज्यात त्यांची नियुक्ती होती, ज्यात सुरुवातीला त्यांना उपजिल्हा जिल्हाधिकारी(एडीएम), एसडीएम, सीडीओ, एसडीओ किंवा जॉइंट कलेक्टर म्हणून आपली सेवा सुरू करावी लागते. ही पदे प्रत्येक राज्याच्या गरजेनुसार बदलू शकतात. या पदांवर एकूण 6 वर्षे घालवल्यानंतर आयएएस अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी, उपायुक्त म्हणून नियुक्ती केली जाते.
प्रशिक्षण कालावधीत पगार मिळतो का? प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्यांना लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये प्रशिक्षणादरम्यान सरकार वेतन देते. दरमहा 56,100 रुपये पगार मिळतो, त्यात टीए-डीए आणि एचआरएचा समावेश नसतो. मात्र, त्यांच्या पगारातून अनेक कपात केली जातात. अशाप्रकारे त्यांना सुरुवातीला जवळपास 35000 रुपये हातात येतात.