Parenting: मुलांना हुशार आणि एकपाठी बनवायचंय? 'या' पाच गोष्टी त्यांच्याकडून रोज करवून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 03:01 PM 2024-07-27T15:01:11+5:30 2024-07-27T15:18:00+5:30
Parenting Tips: विद्यार्थी दशेत अभ्यासाचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे. परंतु, त्या काळात केलेल्या कंटाळ्याची मोठी किंमत भविष्यात मोजावी लागते आणि वेळेतच अभ्यास का नाही केला याचा पश्चात्तापदेखील होतो. त्यात सध्याची पिढी तर मोबाईलमुळे अधिकच आळसावली आहे. त्यांना हुशार आणि एकपाठी बनवावं असे प्रत्येक पालकाला वाटते, त्यासाठी बाल मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेल्या पाच गोष्टी त्यांच्याकडून रोज करवून घ्या! मुलं हुशार असतात, पण कोणाला अभ्यासाची आवड नसते तर कोणाला लिहिण्या वाचण्याची! किंवा सगळं असूनही कंटाळा हे एकमेव कारण त्यामागे असू शकतं. अभ्यास कर, अभ्यास कर सांगूनही मुलं ऐकत नाही आणि घरात वादाला आयता विषय मिळतो. मुलं निवांत खेळतात, पालक स्वतःचा त्रागा करून घेतात. अशा वेळी बाल मानसोपचार तज्ज्ञ सांगतात, 'मुलांची स्मरण शक्ती वाढवण्यावर भर द्या, जेणेकरून लहान वयात ते एकपाठी होतील. म्हणजेच एकदा वाचलेलं, ऐकलेलं त्यांना दीर्घकाळ स्मरणात राहील. त्यासाठी पुढे दिलेल्या पाच गोष्टी त्यांच्याकडून नियमितपणे करून घ्या.
सकाळी उठून मलासनात बसवा आणि कोमट पाणी प्यायला द्या. मलासन अर्थात भारतीय शौच पद्धतीचे आसन! त्या स्थितीत बसून पाणी प्यायल्याने पोटरीवर ताण येतो. तिथे असलेले रक्त मेंदूकडे प्रवाहित होते आणि स्मरण शक्ती वाढायला मदत होते.
लहान वयात मुलांचे शरीर लवचिक असते. त्यांना व्यायामाची सवय लावा. तसेच मेंदूकडे रक्तपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून रोज २ मिनिटं शीर्षासन करून घेण्याचा सराव करवून घ्या. त्यामुळे मन स्थिर होईल, लवचिकता वाढेल आणि स्मरण शक्ती वाढेल.
पूर्वी मुलं खेळायला गेली की मातीत माखून यायची. आता त्यांच्या कपड्याना मातीच लागत नाही की भरपूर घामही येत नाही. मैदानी खेळ मुलं खेळतच नाहीत. मात्र अनवाणी खेळण्याचा परिणाम असा, की त्यामुळे तळ पायावरील पॉईंट दाबले जाऊन मेंदूकडे सुरळीत रक्त पुरवठा होईल. मुलांना एकदा वाचलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतील. त्यासाठी मुलांना मातीत, गवतात रोज अर्धा तास खेळायला पाठवा.
अलीकडे प्रत्येक गोष्टीत चीज घालण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय जंक फूड मध्ये कमी प्रतीचे तेल, तूप यांचा केलेला मारा पाहता विद्यार्थ्यांना घरच्या जेवणाची गोडी लावा. जेणेकरून ऐन तारुण्यात त्यांना बीपी, डायबेटीस, लिव्हर, कोलेस्ट्रॉल इत्यादी त्रास होणार नाहीत. शिवाय त्यांची प्रजनन क्षमता देखील कमकुवत होणार नाही.
स्मरणशक्ती वाढवण्याचा आणखी एक सोपा उपाय म्हणजे जेवताना छोटे छोटे घास खा, प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा. खाल्लेल्या अन्नपदार्थाचे पाणी होऊ द्या आणि प्यायला घेतलेले पाणी घोट घोट प्या. त्यामुळे आपसुख पचन शक्ती वाढेल आणि आळस कमी होऊन उत्साही वाटेल.
तामसी आहाराची जागा सात्विक आहाराने घ्या. कोणत्याही फळाचा ताजा ज्यूस प्यायल्याने बुद्धीला खूप चांगला खुराक मिळतो. बुद्धी तेजस्वी होते आणि ताजेतवाने वाटते. मुलांना रोजच्या रोज फळांचा रस देता आला तर उत्तमच, पण ते शक्य झाले नाही तर आठवड्यातून एकदा उसाचा रस, मोसंबीचा रस, नारळ पाणी इ. जरूर पाजा.