ATM नं व्यवहार करण्यापूर्वी दोन वेळा Cancel बटण दाबल्यानं तुमचा पिन चोरी होत नाही? सत्य काय? वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 05:03 PM 2021-06-15T17:03:28+5:30 2021-06-15T17:09:26+5:30
सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस व्हायरल होत असतात. त्यात अनेक खोट्या मेसेजेसमुळे लोकांमध्ये मोठा गैरसमज निर्माण होतो. तर अनेकदा फसवणुकीच्या तक्रारीही समोर येतात. ATM च्या वापराबाबतीतला एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल झालाय. त्याबद्दल आपण जाणून घेऊयात... सोशल मीडियात सध्या ATM कार्डच्या वापरासंबंधीचा मेसेज व्हायरल झाला आहे. यात ATM कार्ड वापरण्यापूर्वी ATM मशीनवरील Cancel बटण दोन वेळा दाबल्यानंतरच कार्ड वापरण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेनं दिला असल्याचं सांगितलं जात आहे.
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या मेसेज संदर्भात आता केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे. PIB Fact Check नं या मेसेज संदर्भातील पोलखोल केली असून ATM वापरासंदर्भात व्हायरल होणारा सदर मेसेज साफ खोटा असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सोशल मीडियात व्हायरल होणारी पोस्ट फेक असल्याचं PIB च्या Fact Check टीमनं स्पष्ट केलं आहे. रिझर्व्ह बँकेनं अशापद्धतीचा कोणताही सल्ला जारी केलेला नाही.
ATM कार्ड हे ATM मशीनमध्ये टाकण्याआधी मशिनमधील Cancel बटण दोन वेळा दाबल्यानं तुमचा ATM पिन नंबर चोरी केला जाऊ शकत नाही, असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याच मेसेजबाबत PIB Fact Check नं संबंधित मेसेज फेक असून अशापद्धतीचं कोणतंही विधान किंवा सल्ला रिझर्व्ह बँकेनं दिलेला नसल्याचं सांगितलं आहे.
PIB फॅक्ट चेक टीमकडून सोशल मीडियात व्हायरल झालेला फेक मेसेज देखील ट्विट करण्यात आला आहे. अशासंबंधिचा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला तर त्यावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला PIB नं दिला आहे.
ATM पिन हॅक करणारा एखादा व्यक्ती एका ATM मशिनमध्ये कीपॅड सेटअप ठेवून गेलेला असल्यास तुम्ही व्यवहार सुरू करण्याआधी Cancel बटण दाबलं तर संबंधित हॅकरनं सेट केलेली संपूर्ण प्रणाली निष्क्रीय होते. यातून तुमचा ATM पिन सुरक्षित राहतो, असं व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे. PIB Fact Check नं हे पूर्णपणे खोटी माहिती असल्याचं स्पष्ट केलं आहे.
ATM व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकानं आपली वैयक्तिक माहिती आणि पिन कुणालाही देऊ नये याची काळजी बाळगावी हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचं PIB नं सांगितलं आहे. तसंच KYC अपडेट करण्यासाठी कोणताही फोनकॉल आल्यास आपली वैयक्तिक माहिती फोनवर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. वैयक्तिक माहिती किंवा पिन कोणत्याही बँक, कंपनीकडून विचारला जाऊ शकत नाही. याशिवाय मोबाइल मेसेजमध्ये कोणत्याही अनोळखी वेबलिंकवर क्लिक करणं टाळावं, असाही सल्ला देण्यात आला आहे.