विजेच्या मीटरसोबत २०५ रुपयांचे डिव्हाईस लावा, 40 टक्के वीज बिल वाचवा; असलं काही असतय का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 01:07 PM 2022-07-23T13:07:15+5:30 2022-07-23T13:12:11+5:30
How to Save Electricity Bill with Power Saver Fact Check in Marathi: महिन्याचे येणारे वीज बिल ४० ते ५० टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो. खरेच होते का हो? त्या डिव्हाईसमध्ये नेमके काय काय असते... आजकाल उन्हाळा असो की पावसाळा विजेचा मीटर एवढा पळू लागलाय की १ बीएचके फ्लॅटधारकांचे वीज बिल ९०० रुपये आणि टु बीएचके फ्लॅटधारकांचे बिल १५०० ते १८०० रुपये येऊ लागले आहे. हेच वीज बिल कोरोना संकटापूर्वी निम्मे येत होते. यामुळे आता सारेच जण लुबाडले जात असल्याच्या भावनेत आहेत. अशातच तुम्हाला अनेक ठिकाणी एक लाल रंगातील चार्जरसारखे डिव्हाईस दिसते, ते म्हणे ४० टक्के वीज वाचविते.
यामध्ये तुम्हाला महिन्याचे येणारे वीज बिल ४० ते ५० टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा करण्यात येतो. खरेच होते का हो? माहिती नाही.
परंतू २०५ रुपयांनाच तर आहे. घेऊन बघायला काय हरकत आहे, शिक्का चालला तर फायदा नाही चालला तर तेरी भी चूप मेरी भी चूप, गुपचूप कोनाड्यात टाकून द्यायचे. परंतू असे केल्याने या कंपन्यांचे फावते. त्यांना गिऱ्हाईक भेटत राहतात. फसले तरी दुसऱ्यांना कळत नसल्याने नवे गिऱ्हाईक भेटत जातात.
बरे या डिव्हाईसमध्ये असे काय असते जे तुम्हाला विश्वास देते की बिल कमी होईल. ते तर साधा चार्जर किंवा मच्छर पळविणारे मशीनसारखेच असते. ते सॉकेटमध्ये लावायचे असते. ते म्हणे तुमचा जादाचा व्होल्टेज म्हणजे विजेचा फ्लो असतो ते कंट्रोल करते. म्हणजेच मीटरमधून जी वीज वाहून तुमच्या घरात येते ती जादाची वीज रोखते आणि तुमचे रिडिंग कमी होते.
या डिव्हाईसमध्ये काय असते बरे... या डिव्हाईसवर लाईट असतात. त्या सॉकेटला ते डिव्हाईस लावले आणि बटन सुरु केले की पेटतात. हिरवी, भगवी आणि लाल, तिन्ही एकदम पेटतात. खरेतर त्यांची काहीच गरज नाही. एक जरी दिली तरी ते सुरु आहे की नाही ते समजतेच. पण ते आपल्याला मुर्ख बनविण्यासाठी असते. साधारण आपला समज असतो की हिरवी म्हणजे विज वाचवतेय.
लाल म्हणजे जादाचा लोड असतो तो, म्हणजे आपण समज करून घेतो की जादाची वीज वाहून जात होती. तसे काहीच नाही यात. आतमध्ये फॅनला असतो ना त्याच्या दुप्पट क्षमतेचा कॅपॅसिटर असतो बाकी काही नाही. यामुळे तुम्ही ज्या सॉकेटमध्ये ते लावलेय ते अख्ख्या घराची किंवा टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनची वीज कशीकाय नियंत्रित करू शकेल? त्या कॅपॅसिटरची किंमत २० ते ४० रुपये असते. तो आपल्याला पावर सेव्हर म्हणून २०० ते ३५० रुपयांना विकला जातो.
असा जर कुठचा पावर सेव्हर असता तर फिलिप्स, क्रॉम्पटन सारख्या कंपन्यांनी सोडला असता का? त्यांनी बनवून आपल्याला विकला नसता का? त्यांनी त्यांच्या यंत्रांमध्ये वापरला नसता का? याचाही विचार करण्याची गरज आहे.
या पावर सेव्हर डिव्हाईसची पोलखोल करणारे अनेक व्हिडीओ नेटवर उपलब्ध आहेत. हा कॅपॅसिटर असल्याने तो काही व्होल्टेज वीज स्टोअर करतो, त्यामुळे तुम्हाला शॉकही लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सावध व्हा आणि फसू नका, हवे तर तुमच्या ओळखीच्या ईलेक्ट्रीशिअनचा सल्ला घ्या.