- मोहिनी घारपुरे देशमुखलेगिन्स वा जीन्स दोन्हीहीवर खुलून दिसणारा कपड्याचा प्रकार म्हणजे ट्युनिक्स. हा एक प्रकारचा ढगळासा, स्लीव्हलेस आणि गुडघ्यांपर्यंत लांब असणारा कपड्याचा प्रकार आहे.साधारणत: पूर्वी रोम आणि ग्रीसमध्ये या प्रकारचे कपडे स्त्रिया आणि पुरूष दोघेहीजण वापरत. लॅटीन भाषेत या प्रकारच्या कपड्यांना ‘ट्यूनिका’ असं म्हटलं जात. त्यावरूनच या प्रकाराला ‘ट्यूनिक’ असं नाव मिळालं.खरंतर इतिहासात डोकावून पाहिलं तर याप्रकारचे कपडे आदिमानवानं वापरल्याचे दाखले मिळतात. 1830 च्या आसपास लहान मुलं ट्यूनिकवर बेल्ट वगैरे लावत असल्याचंही सापडतं. आधुनिक काळात मात्र धार्मिक अंगानेही ट्यूनिक्सचा वापर झाल्याचं दिसतं.अलिकडे मात्र हे ट्यूनिक्स फॅशन जगतात इतके लोकप्रिय आहेत की यामध्ये प्रचंड प्रकार दिसून येतात. त्याचं ढोबळ स्वरूप, अर्थात पायाच्या गुडघ्यापर्यंत किंवा त्याहून उंचीला थोडेसे कमी आणि काहीसे ढगळे असंच असतं. मात्र, तरीही फॅशन डिझायनर्सनी या संपूर्ण सेगमेंटमध्येही बरेच प्रकार आणलेले आहेत. झुळझुळीत तलम कपडा, असिमेट्री आणि बाह्यांचे आणि गळ्याचे अक्षरश: शेकडो प्रकार हीच या ट्यूनिकची खासियत आहे. विशेष म्हणजे लेगिन्स, जीन्स आणि स्कर्टवरही ट्यूनिक आरामात घालता येऊ शकतो. फक्त स्कर्टवर जर ट्यूनिक घालायचा असेल तर ट्यूनिकपेक्षा स्कर्टची लांबी अधीक हवी एवढीच अट काळजीपूर्वक फॉलो केली पाहिजे. समुद्रकिनाऱ्यावर किंवा तरणतलावावर पोहायला जात असाल तर तुमच्यासाठी ट्यूनिक बेस्ट प्रकार ठरेल. याचे कारण तलम, झिरझिरीत आणि सहज दूर सारता येण्याजोगे हे वस्त्र आहे हीच त्याची विशेषत: या ठिकाणी उपयोगी पडते. तर असे हे ट्यूनिक खरंतर माणसानं आपल्या प्रारंभीच्या काळी शिकार वगैरे करताना वापरले आहे त्यामुळे त्या प्रकारच्या कपड्याचे नाविन्य नाही. मात्र तरीही या ट्यूनिक्सला मिळालेला आधुनिक टच, त्याचे आधुनिक रूपडे फॅशनेबल स्त्रीयांच्या नजरेतून सुटलेले नाही. त्यामुळेच स्वत:ला मॉडर्न म्हणवणार्या प्रत्येक स्त्रीच्या वॉर्डरोबमध्ये हे ट्यूनिक्स हमखास सापडणारच हे नक्की. ट्यूनिक जॅकेट्सकोणत्याही ड्रेसवर गुडघ्यापर्यंत लांब आणि तलम असे ट्यूनिक जॅकेट्स देखील वापरता येऊ शकतात. श्रग प्रमाणे पण तरीही एक हटके लुक या ट्यूनिक जॅकेटमुळे मिळतो. विशेष म्हणजे स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांसाठीही हे ट्यूनिक जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे पुरूषही स्मार्ट लुक हवा असेल तर आपल्या वॉर्डरोबमध्ये ट्यूनिक जॅकेट्स समाविष्ट करू शकतात. स्टँड कॉलर आणि एकदम प्रॉपर फिटींगचे ट्यूनिक जॅकेट्स पुरूषांनी घातल्यास त्यांना एकदम रूबाबदार लुक येतो.आॅनलाईन गारमेंट कंपन्यांच्या वेबसाईटवर या ट्यूनिक जॅकेट्सचे पुष्कळ प्रकार उपलब्ध आहेत, त्यांचाही आधार घेऊन शॉपिंग करता येईल.