- सारिका पूरकर गुजराथीसंगीत... मानवी जगण्याला, समाधान, उत्साह, प्रेरणा, चेतना, उमेद, जिद्द देणारी कला. संगीत या कलेतील हीच ताकद आपण दररोज अनुभवत असतो. पण ती केवळ हेडफोन, आयपॉडवर गाणी ऐकून. पण याव्यतिरिक्त संगीत चराचरात भिनलेलं आहे, त्याचाही आस्वाद घ्यायला हवा, नाही का? संगीताचा असाच वेगळा आनंद तुम्हाला घरात विंड चाईमपासून मिळतो. कारण हवेची झुळूक आल्यावर या विंडचाईममधून जे सुमधूर स्वरतरंग उमटतात ते खूपच आल्हाददायक, मंद-धुंद करणारे असतात. फेंगशूई वास्तुशास्त्रातील विंड चाईम हा प्रकार आता भारतातही लोकप्रिय झाला आहे. वास्तुशास्त्राचे माहित नाही पण कलाप्रेमी, संगीतप्रेमींसाठीही विंडचाईम हा प्रकार खूप छान आहे. शिवाय घर सजावटीतही याचा हातभार लागतो. हे विंड चाईम तुम्ही घरी सहज बनवू शकता.चाव्यांचे विंड चाईम घरात वापरात नसलेल्या काही चाव्या असतील तर गोळा करुन ठेवा. गंजल्या असतील तर सॅण्डपेपरनं घासून, धुवून कोरड्या करा. या चाव्यांना आकर्षक रंगात रंगवून घ्या. आकर्षक रंगाची जाड लोकर घेऊन चावी बांधून घ्या. लोकरीची उंची जरा जास्त हवी. खराब झालेली कूकरची रिंग घेऊन त्यावरही लोकर, सुतळी गुंडाळून घ्या. आता विविध आकाराच्या चाव्या लोकरीच्या सहाय्यानं रिंगवर वर्तुळाकार बांधून घ्या. यातून एकदम मस्त कलरफूल विंड चाईम तयार होईल. पेपर कपचे विंड चाईममोठया आकाराचे पेपर कप घ्या. त्यांना रंगवून घ्या. डिझाइन्स अन डॉट्सनं ते सजवा. कप पालथा घाला. (उलटा करा, पिण्याची बाजू खाली). आता दोऱ्यात आकर्षक क्रिस्टल मणी, बीड्स, पाईप्स ओवून घ्या. दोऱ्याची लांबी खूप लांब आणि आखूड नको, बेताची हवी. आता कपच्या खालच्या मोकळ्या बाजूवर गोलाकार छिद्र करुन हे ओवलेले लटकन बांधून टाका. फक्त पेपर कपचे विंड चाईमही बनवता येते. त्याकरिता तीन विविध आकारातील पेपर कप घ्या, (मोठा, त्यापेक्षा लहान व त्यापेक्षा आणखी लहान) तीनही पेपर कप्सना वेगवेगळ्या आकारात रंगवून डिझाईन्स काढून घ्या. हे तीन कप आधी लहान, त्यावर थोडा मोठा व त्यावर सर्वात मोठा या क्रमानं नॉयलॉन दोऱ्यात ओवून घ्या. ओवताना सर्वात लहान घंटी (बाजारात सहज मिळते) आधी ओवा, त्यानंतर कप ओवून घ्या. इको फ्रेंडली विंड चाईमबांबूच्या बारीक काड्यांना रंगवून, सजवून त्या दोऱ्यात ओवून घ्या. लहान-मोठ्या आकारातील या काड्या रिंगवर अडकवल्या तर इको फ्रेंडली विंड चाईम तयार होईल.विंड चाईमसाठी विविध रिंग, बेस बाजारात मिळतात, त्याचाही वापर करता येतो. विविध आकारातील शंख, शिंपले ओवूनही सुंदर विंड चाईम तयार होते. जरा हटके विंड चाईमकिचनमध्ये वापरात नसलेले स्टीलचे चमचे दोऱ्यात ओवून एका प्लेटवर छिद्रं करुन अडकवल्यास हटके विंड चाईम तयार होईल. रिकामे पत्र्याचे टीन रंगवून, सॉफ्ट ड्रिंकच्या मेटलच्या झाकणांपासून सुंदर विंड चाईम सहज बनवता येतील. एकदा तुम्हीही करून बघा!