जत्रा : मानधनाबाबत कुशलचा झाला गैरसमज; 90 हजारच्या जागी हातात पडले फक्त 'इतके' पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 02:42 PM2024-05-14T14:42:42+5:302024-05-14T14:58:37+5:30

'जत्रा' सिनेमासाठी कुशल बद्रिकेला किती मानधन मिळालं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा

२००५ साली प्रदर्शित झालेला 'जत्रा' मराठीतील लोकप्रिय कॉमेडी सिनेमांपैकी एक आहे.

भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे, कुशल बद्रिके, विजय चव्हाण, क्रांती रेडकर, संजय खापरे अशी या सिनेमाची स्टारकास्ट होती.

केदार शिंदेंचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आजही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहिला जातो.

'जत्रा'मधील कलाकारांना या सिनेमाने रातोरात स्टार केलं. कुशल बद्रिकेचा हा पहिलाच सिनेमा होता.

'जत्रा'मधून कुशलची मोठ्या पडद्यावर एन्ट्री झाली होती. पण, या सिनेमासाठी त्याला किती मानधन मिळालं होतं? हे माहितीये का?

खुद्द कुशलनेच 'मॅडनेस मचाऐंगे' या शोच्या मंचावर याचा खुलासा केला आहे.

"या सिनेमात माझं ३० दिवसांचं काम होतं. माझी भूमिकाही मोठी होती. मानधनाबाबत बोलण्यासाठी मी केदार सरांना भेटायला गेलो होतो."

"केदार सरांनी मला ३ हजार रुपये मिळतील असं सांगितलं. मला वाटलं की मला प्रत्येक दिवसाला ३ हजार मिळणार आहे. म्हणजे ३० दिवसांचे ९० हजार असा हिशोब मी केला होता".

"मी कॉन्ट्रॅक्टवर सही करण्यासाठी पेपर हातात घेतले. केदार सरांनी मला विचारलं की तू पेपर वाचले आहेस ना? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे तुझं पॅकेज आहे".

"३० दिवसांच्या कामासाठी मला ३ हजार रुपये मानधन मिळालं होतं. मला ते खूपच कमी वाटत होते. तेव्हा मी मित्राला फोन करून याबाबत सांगितलं."

"तेव्हा माझ्या मित्राने मला हा सिनेमा करण्याचा सल्ला दिला होता. पण, या सिनेमाने मला स्टार केलं", असं कुशल म्हणाला.