"मासे खाल्ल्यावर डोळे ऐश्वर्यासारखे होतात", मंत्रीमहोदयाचं अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:57 PM2023-08-21T12:57:33+5:302023-08-21T16:47:56+5:30

सोशल मीडियाच्या जमान्यात बोलणं, त्यातली त्यात काहीही बोलण्याची स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, जेव्हा जबाबदार व्यक्तींकडून अशी विधानं केली जातात, तेव्हा त्यांची सर्वत्र चर्चा होते.

सोशल मीडियाच्या जमान्यात बोलणं, त्यातली त्यात काहीही बोलण्याची स्पर्धाच लागल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, जेव्हा जबाबदार व्यक्तींकडून अशी विधानं केली जातात, तेव्हा त्यांची सर्वत्र चर्चा होते.

राजकीय व्यक्तींकडून, बड्या नेत्यांकडूनही अजब-गजब विधानं केली जातात. यापूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबद्दल विधान केलं होतं.

आता, भाजपा नेते आणि मंत्री विजयकुमार गावित यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल असंच विधान केलंय. सध्या ते आदिवासी विकास खात्याचे मंत्री आहेत.

''नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर झाले'' असं विधान विजयकुमार गावित यांनी केलंय. मासे खाण्याचे फायदे सांगताना भावनेच्या भरात गावित यांनी ऐश्वर्या रायच्या डोळ्यांचे उदाहरण दिलं.

''तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? त्यांनी काही सांगितलं की नाही ऐश्वर्या रॉयबद्दल? ती समुद्राच्या किनारी राहणारी. बेंगलोरची समुद्राच्या किनारी राहणारी.

ती दररोज मासे खायची. बघितले ना तिचे डोळे? तसे तुमचेही डोळे होणार. हाही एक फायदा आहे'', असे म्हणत विजयकुमार गावित उपस्थितांना मासे खाण्याचे फायदे सांगितले.

मासे खाल्ले ना तर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात, असेही गावित यांनी म्हटलं. माशात एकप्रकारचं तेल असतं. त्या तेलामुळे त्वचाही चांगली दिसते, असे फायदे गावित यांनी सांगितले.

धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय कुमार गावित यांनी हे वक्तव्य केले.

विशेष म्हणजे गावित यांच्या भाषणावेळी मंचावर त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. मात्र, भावनेच्या भरात उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना त्यांनी मासे आणि ऐश्वर्या रायचे उदाहरण दिलं.