Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन वर्षातून दोनदा वाढदिवस साजरा करतात, कारण माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 03:06 PM2024-08-04T15:06:53+5:302024-08-04T16:04:01+5:30

अमिताभ बच्चनच्या चाहत्यांनी नुकतंच अभिनेत्याचा 'दुसरा वाढदिवस' साजरा केला.

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये 'मेगा स्टार' आणि 'बिग बी' म्हणूनही ओळखलं जातं. अमिताभ यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आजही त्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्याविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना कायम उत्सुकता असते.

बिग बी यांच्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अमिताभ बच्चन दरवर्षी दोनदा वाढदिवस साजरा करतात. एक ११ ऑक्टोबरला जेव्हा त्यांचा जन्म झाला आणि दुसरा २ ऑगस्टला. ज्यामागे कारण देखील फार मोठं आहे.

अमिताभ बच्चन हे २ ऑगस्टला आपला दुसरा वाढदिवस साजरा करतात. कारण, यादिवशी ते मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. १९८२ मध्ये बिग बी यांना दुसरं आयुष्य मिळालं. तेव्हा अमिताभ बच्चन एका मोठ्या अपघातातून बचावले होते.

१९८२ साली 'कुली' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता. त्यात अमिताभ बच्चन यांना जीव गमवण्याची वेळ आली होती. या अपघातानंतर अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखव करण्यात आले होते. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या. डॉक्टरांनी अमिताभ बच्चन हे वाचतील ही आशा सोडली होती.

बिग बी यांची प्रकृती प्रचंड गंभीर होती. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. अमिताभ मृत्यूशी झुंज देत होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करत अमिताभ धोक्याबाहेर असल्याचे जाहिर केले होते. ती तारीख होती 2 ऑगस्ट.

कुली अपघातानंतर 2 ऑगस्टला अमिताभ यांना जीवदान मिळाले होते. हा त्यांचा दुसरा जन्म होता. त्यामुळे अमिताभ 2 ऑगस्टला आपला दुसरा वाढदिवस साजरा करतात.

दोन महिने बिग बी रुग्णालयात दाखल होते. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर बिग बी म्हणाले होते, 'मृत्यू आणि जीवन यांच्यामधील भयानक अग्निपरीक्षा होती. दोन महिन्यांचा रुग्णालयातील प्रवास आणि मृत्यूशी झुंज आता संपली आहे. मृत्यूवर विजय मिळवून घरी परतत आहे'.

आजपर्यंत बॉलिवूडमध्ये बिग बी यांची जागा कोणताही अभिनेता घेवू शकला नाही. अमिताभ यांच्या वयाची ८० वर्ष ओलांडली तरी आजही ते विविध सिनेमांमधून प्रेक्षकांंचं मनोरंजन करत आहेत.

अमिताभ यांचे जगभरात हजारो फॅन्स आहेत. गेली अनेक वर्ष हे चाहते बिग बींवर मनापासून प्रेम करत आहेत. आजही मोठ्या पडद्यावर बिग बी यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

सोशल मीडियावर देखील कायम अमिताभ बच्चन यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.एवढंच नाही तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात.