'सलग 148 तास शूट, जेंट्स टॉयलेटमध्येच अंघोळ...' अंकिताने केला 'पवित्र रिश्ता' बाबत खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 11:47 AM2023-09-03T11:47:45+5:302023-09-03T11:56:15+5:30

अंकिता लोखंडेला 'पवित्र रिश्ता' मुळे मोठं यश मिळालं पण त्यासाठी...

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) म्हटलं की आठवते 'पवित्र रिश्ता' ही मालिका. या मालिकेतून अंकिता रातोरात स्टार झाली . अर्चना या भूमिकेने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. अर्चना आणि मानव ही जोडी हिट ठरली.

मात्र मालिकेचं शूटिंग वाटतं तितकं सोपं नसतं तेच खरं. छोटे कलाकार असो किंवा अगदी दिग्ग्ज कलाकार सर्वांनाच तासन् तास शूटिंगला सामोरं जावं लागतं.

पवित्र रिश्ता ही मालिका तब्बल ५ वर्ष चालली. मालिकेतील अनेक पात्र बदलली. मात्र अंकिताने शेवटपर्यंत ही मालिका सोडली नाही. नुकतंच मालिकेला १४ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त अंकिताने मालिकेच्या आठवणी जाग्या केल्या.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अंकिताने 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या सेटवर नेमकं कसं वातावरण असायचं याबाबत संवाद साधला. शूट करताना किती हाल व्हायचे याचाही खुलासा तिने यावेळी केला. तिची मुलाखत सध्या खूपच चर्चेत आहे.

पवित्र रिश्ता फारच लोकप्रिय मालिका असल्याने त्याचं शूट अनेक तास चालायचं. तसंच अर्चना हे पात्र मुख्य असल्याने प्रत्येक सीनमध्ये अंकिता असायचीच. एकदा तर सलग १४८ तास काम केलं होतं असा खुलासा अंकिताने केला आहे.

अंकिता म्हणाली,'मी माझ्या आयुष्यात कधीच इतकी मेहनत घेतली नसेल जितकी या मालिकेसाठी घेतली. मी तीन महिने घरीच गेले नव्हते. दिवस रात्र मी शूट करत होते. माझं मुख्य कॅरेक्टर असल्याने ते लोक मला घरी जायची परवानगीच द्यायचे नाहीत.'

हे खरंय की मी जेंट्स बाथरुममध्येच अंघोळ करायचे. ते माझ्यासाठी बाथरुम रिकामं ठेवायचे. हेअरड्रेसर कपडे इस्त्री करायचे. अनेकदा नवीन अंतर्वस्त्रही मिळायची. तेच कपडे धुवून इस्त्री करुन घालायला लागायचे असा खुलासा अंकिताने केला.

ती पुढे म्हणाली,'मला हे सगळं आवडत होतं कारण माझ्याकडे काय हार्डवर्क केलं हे सांगायला गोष्ट होती. माझी आई सुद्धा सेटवरच थांबायची. आम्ही तिथेच झोपायचो. माझे सतत सीन्स असायचे म्हणून मला घरी जाता येत नव्हतं.

एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे अनेक कलाकार रातोरात स्टार झाले. त्यातलाच एक सुशांतसिह राजपूत. सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवत यश मिळवलं, ओळख मिळवली. मात्र २०२० साली त्याचा दुर्दैवी अंत झाला.