वर्षा उसगावकरांचा अपमान, अंकिताला रडवलं; 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारी निक्की तांबोळी आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:11 PM2024-08-01T17:11:52+5:302024-08-01T17:18:17+5:30

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारी ही निक्की नक्की आहे तरी कोण?

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी ५'ला नुकतीच सुरुवात झाली असून यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्री निक्की तांबोळीदेखील सहभागी झाली आहे.

बिग बॉसच्या घरात निक्कीने तिचा गेम खेळायला सुरुवात केली आहे. या ना त्या कारणाने निक्की चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत तिने घरातील काही सदस्यांशी हुज्जत घातली आहे तर काहींना सळो की पळो करून सोडलं आहे.

अनेकदा तिचे वर्षा उसगावकरांशी वाद झाले. तर भांडणात तिने वर्षा यांचा अपमान केल्याचंही दिसलं आहे.

एवढंच नव्हे तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरलाही निक्कीने रडवलं आहे. पण, पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारी ही निक्की नक्की आहे तरी कोण?

निक्की ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्मलेली निक्की सध्या मुंबईतील डोंबिवलीमध्ये राहते.

तिने अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. याशिवाय 'कंचना 3', 'चिकती गदिलो चित्रकोट्टु' आणि 'थिप्पारा मीसम' या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.

निक्की बिग बॉस १४मध्ये सहभागी झाली होती. या सीझनच्या टॉप ३ स्पर्धकांपैकी ती एक होती. 'खतरों के खिलाडी' या शोमध्येही ती सहभागी झाली होती.

आता बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील ती सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा आहे. या बिग बॉसमध्ये ती टॉप ३मध्ये स्थान मिळवणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.