९० च्या दशकातील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं अभिनय सोडून कोट्यवधी कमावले; औरंगाबादशी खास कनेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 07:06 PM 2023-02-14T19:06:12+5:30 2023-02-14T19:09:01+5:30
पापा कहते हैं या चित्रपटातील 'घर से निकलते ही कुछ दूर चलते ही' हे गाणे ९० च्या दशकात प्रचंड गाजले होते. या गाण्यात दिसणारी अभिनेत्री मयुरी कांगो आणि जुगल हंसराज रातोरात घराघरात प्रसिद्ध झाले.
या गाण्यात दोघांची केमिस्ट्री चांगलीच आवडली होती. मयुरीचे निळे डोळे आणि किलर स्माईलने लाखो लोकांना तिचे चाहते बनवले होते. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने लाखो हृदयांवर राज्य करणारी मयुरी गेल्या २२ वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीपासून दूर आहे.
मयुरीने १९९५ साली नसीम या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर तिने अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले. अजय देवगण, अर्शद वारसी आणि बॉबी देओलसोबत बादल यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये ती दिसली.
मयुरी शेवटची साऊथच्या चित्रपटात दिसली होती. २००० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव वामसी होते. मात्र फार कमी लोकांना माहिती असेल की अभिनयासोबतच मयुरी अभ्यासातही हुशार होती. चित्रपटात अपेक्षित यश न मिळाल्याने तिने आपले करिअर दुसऱ्या क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतला.
एनआरआय आदित्य ढिल्लनशी लग्न केल्यानंतर ती अमेरिकेत शिफ्ट झाली आणि येथून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केले. सात वर्षे अमेरिकेत काम केल्यानंतर २०११ मध्ये मुलगा कियानला जन्म दिल्यानंतर ती भारतात परतली आणि फ्रेंच जाहिरात पब्लिसिस ग्रुपच्या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करू लागली.
२०१९ मध्ये तिच्या हाताला मोठे यश मिळाले आणि ती Google India मध्ये कामाला लागली. तिच्या कठोर परिश्रम आणि प्रतिभेमुळे ती Google India ची इंडस्ट्री हेड बनली. मयुरी आज सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मयुरी १५ लाख डॉलर कमावते.
मयुरी कांगोचा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून ती सेंट झेविअर्स, सेंट फ्रान्सिस येथून शालेय शिक्षण आणि देवगिरी महाविद्यालयातून पुढील शिक्षण झाल्यानंतर तिने मुंबई गाठली. २००५ साली ती एमबीए करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली होती.
अभिनयाच्या माध्यमातून दाखविलेली कला आणि करिअरमध्ये गाठलेल्या उंचीमधून दिसलेली बुद्धिमत्ता अशी मयुरी कांगो म्हणजे कला, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा उत्कृष्ट मिलाफ. करिअरमध्ये एक उंची गाठत मयुरी सध्या गूगलमध्ये इंडस्ट्री हेड म्हणून कार्यरत आहेत.
मयुरीला दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झाचा बॉलिवूड चित्रपट 'नसीम' (१९९५) मध्ये ब्रेक मिळाला जेव्हा ती १२ वीत होती. सुरुवातीला अभ्यासामुळे हा चित्रपट करायला तिला भीती वाटत होती, पण नंतर तीने ही भूमिका स्वीकारली.
एका मुलाखतीत मयुरी म्हणाली होती की, औरंगाबादमध्ये माझे बालपण खूप छान गेले. सायकलवर, सनीवर आम्ही मित्रमैत्रिणी मिळून खूप फिरायचो. खूप सुरक्षित शहर आहे. दौलताबाद, वेरूळ अगदी जवळच असल्याने कायम भटकंती करायचो. तिथले लोक आणि आमची भटकंती खूप मिस करते असं तिने सांगितले.