Sukesh Chandrasekhar : जॅकलीनच्या वाढदिवशी सुकेशने उघडली तिजोरी; गिफ्ट केलं यॉट, १०० आयफोन, १५ कोटी, ३०० घरं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 01:55 PM2024-08-12T13:55:44+5:302024-08-12T14:08:42+5:30

Sukesh Chandrasekhar And Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसचा ११ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. या खास प्रसंगी जेलमध्ये असलेल्या सुकेश चंद्रशेखरने तिजोरी उघडली. कोट्यवधी रुपयांच्या गिफ्टची घोषणा केली.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा ११ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. या खास प्रसंगी दिल्लीतील जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने आपली तिजोरी उघडली आहे. कोट्यवधी रुपयांच्या गिफ्टची घोषणा केली आहे.

सुकेशने अभिनेत्रीला एक खास पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्याने वाढदिवसाच्या गिफ्ट्सचा उल्लेख केला. या यादीमध्ये प्रायव्हेट यॉटपासून चाहत्यांसाठी १०० आयफोन, केरळच्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांसाठी १५ कोटी रुपये आणि ३०० घरं बांधण्याचे आश्वासन यांचा समावेश आहे.

सुकेश चंद्रशेखर नेहमीच विविध प्रसंगी जेलमधून जॅकलीनला पत्र लिहित असतो. तो त्या पत्रातून त्याचं प्रेम व्यक्त करतो. आताही त्याने अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त खास पत्र लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मेरी बच्ची, मेरी बम्मा म्हणत सुकेशने जॅकलीनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि तिला यावर्षी यश, आरोग्य आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आशीर्वाद दिला. आपण वेगळ्या ठिकाणी असलो तरी आपले विचार आणि आत्मा एकमेकांशी जोडलेलं असल्याचं त्याने म्हटलं आहे.

सुकेशने सांगितलं की, त्याच्याकडे जॅकलीनसाठी वाढदिवसाचे खास गिफ्ट आहे. केरळच्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना मदत करण्यासाठी त्याने १५ कोटी रुपयांची देणगी देण्याचं वचन दिलं आणि या दुर्घटनेत बाधित झालेल्यांसाठी ३०० घरे देण्याचे आश्वासन दिले.

जॅकलीन फर्नांडिसला कोणतंही मटेरियल गिफ्ट म्हणजेच जेट, यॉट, बिर्किग बॅग किंवा हिरा यासारख्या गिफ्टमधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा दुसऱ्यांना मदत केल्यानंतर होणारा आनंद हा खूप जास्त असल्याचं सुकेशने सांगितलं.

जॅकलिनचा हाच आनंद आणखी वाढवण्यासाठी त्याने आपल्या दिलेल्या वचनांची पूर्तता करण्यासाठी केरळ सरकारसोबत काम करण्यासाठी संपूर्ण टीम तैनात केल्याचा देखील आवर्जून उल्लेख केला आहे.

सुकेशने जॅकलिनला आणखी एक सरप्राईज दिलं आहे. 'लेडी जॅकलिन' नावाचं यॉट, जे तिने २०२१ मध्ये निवडलं. हे यॉट पूर्णपणे कायदेशीररित्या आणि टॅक्स देऊन खरेदी केलं गेलं आहे. या महिन्यात त्याची डिलिव्हरी केली जाईल.

दोघांनीही स्वप्न पाहिलं की ते एका यॉटमध्ये एकत्र वेळ घालवतील. म्हणूनच त्याने ते विकत घेतलं आहे. सुकेशने सांगितलं की तो जॅकलिनला खूप मिस करतो. तसेच झालेल्या सर्व वेदनांची भरपाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

११ ऑगस्ट २०२५ रोजी 'रोमिओ आणि ज्युलिएट' स्टाईलमध्ये एकत्र आनंद साजरा करण्यास उत्सुक असल्याचं त्याने म्हटलं आहे. तसेच ज्या १०० फॅन्सनी सपोर्ट केला त्यांना 'iPhone 15 Pro' देणार आहे. यासाठी त्याची टीम यूट्यूबवरून विजेत्यांची निवड करेल असंही सांगितलं.