Photos : 'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली

By मयुरी वाशिंबे | Published: September 30, 2024 08:21 PM2024-09-30T20:21:25+5:302024-09-30T20:30:03+5:30

'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली. त्यावर आपण एक नजर टाकूयात.

'धर्मवीर' सिनेमानंतर अखेर 27 सप्टेंबरला 'धर्मवीर 2 : साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट' सिनेमा प्रदर्शित झाला. धर्मवीर प्रमाणेच त्याच्या सीक्वललाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. . अवघ्या तीनच दिवसांत प्रसाद ओकच्या 'धर्मवीर 2' सिनेमाने देशात 7.92 कोटींचा गल्ला जमवला आहे. सिनेमात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे.

धर्मवीरच्या पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागामध्ये अभिनेता क्षितिज दाते यांनी अतिउच्च दर्जाचा अभिनय केला आहे. एकनाथ शिंदे यांची भूमिका क्षितिश दाते यानेच वटवली असून दाते हे एकनाथ शिंदेच वाटत आहेत. तर चित्रपटाच्या महत्त्वाच्या प्रसंगी एकनाथ शिंदे स्वतः स्वतःच्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याशिवाय, 'धर्मवीर 2' या चित्रपटात महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक व्यक्तीरेखा पहायला आहेत मिळत. शिंदे गटातील काही नेत्यांच्या भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. सिनेमातील या कलाकारांचा जबरदस्त लूक सध्या चर्चेत आहे. 'धर्मवीर 2' मध्ये कोणत्या कलाकाराने कोणाची राजकीय व्यक्तीरेखा साकारली. त्यावर आपण एक नजर टाकूयात.

एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड पुकारलं आणि ते गुवाहाटीला गेले. तेव्हा एका नेत्याची महाराष्ट्रभर चर्चा होती, ते म्हणजे सांगोल्याच्या शहाजी बापू पाटील. 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील' या कार्यकर्त्यासोबतच्या संवादामुळे ते चर्चेत आले होते. शहाजी बापू पाटील यांची भूमिका अभिनेता आनंद इंगळे यांनी साकारली आहे. शहाजी बापू पाटील यांचा लूक, त्यांच्या कपाळावरचा टिळा या गोष्टी अगदी सारख्या केल्यामुळं सिनेमातले शहाजी बापू पाटीलही चर्चेचा विषय ठरले आहेत.

एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे शंभुराज देसाई. 'धर्मवीर 2' मध्ये त्यांची भूमिका अभिजीत थीटे यांनी साकारली आहे. ते अगदी हुबेहुब शंभुराज देसाई यांच्यासारखे दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांचे आणखी एक विश्वासू नेते म्हणजे संदीपान भुमरे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे नेते गुवाहाटीला गेले होते, त्यात संदीपान भुमरे यांचाही समावेश होता. संदीपान भुमरे यांची भुमिका अभिनेते उदय सबनीस यांनी भूमिका साकारली आहे. संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. 'धर्मवीर 2' अब्दुल सत्तार यांची भुमिका अभिनेते कमलाकर सातपुते यांनी साकारली आहे. अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे त्यांचे पूर्ण नाव आहे.

एकनाथ शिंदे यांची साथ देणाऱ्या आमदारांपैकी एक आमदार म्हणजे संजय शिरसाट. अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांनी चित्रपटात शिरसाट यांची भूमिका साकारली आहे. शिरसाट हे शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी ते स्वतःचा रिक्षाचा व्यवसाय सांभाळत होते.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी येथे गेलेल्या नेत्यांमध्ये एक नाव होतं भरत गोगावले. 'धर्मवीर 2' सिनेमात भरत गोगावले यांची भुमिका अभिनेते सुनील तावडे यांनी साकारली आहे. भरत गोगावले यांच्या लूकमध्ये अभिनेते सुनील तावडे अगदी खरे वाटत आहेत.