Rakhi Sawant : "आदिलने मला मारहाण केली, खूप ब्लीडिंग झालं"; राखी सावंतने सांगितलं मिसकॅरेजचं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 10:27 AM2023-08-23T10:27:22+5:302023-08-23T11:16:32+5:30

Rakhi Sawant : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखी सावंतबाबत अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत.

राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आदिलने राखी सावंतबाबत अनेक मोठे धक्कादायक खुलासे केले आहेत.

राखी सावंतनेही दुसरीकडे मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. आदिलच्या प्रत्येक आरोपाला अभिनेत्रीने जोरदार उत्तर दिलं आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर देताना राखीने सांगितले की, ती जन्माने हिंदू आहे, पण तिच्या आईमुळे तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे.

राखीने त्यानंतर आदिलशी लग्न केलं आणि आदिलने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडलं आणि अनेक वेळा मारहाणही केल्याचं म्हटलं आहे. राखीने सांगितले की शैलीच्या माध्यमातून तिची आदिल दुर्रानीशी भेट झाली. त्याला राखीसोबत व्यवसाय करायचा होता.

अभिनेत्रीने सांगितले की, आदिलचा सेकंड हँड कारचा छोटासा व्यवसाय होता. राखी त्याला भेटली कारण तिला कार घ्यायची होती. त्यानंतर आदिलने कार घेण्यासाठी म्हैसूरला येण्यास सांगितले आणि ती तिच्या भावाला घेऊन गेली. तिच्या भावाने आदिलला दोन खोल्या बुक करण्यास सांगितले.

राखीने सांगितले की, आदिलने म्हैसूरमध्ये तिच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर त्याने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले. आमचं लग्न गोव्यात झाले होते. लग्नाच्या 8 महिन्यात तो मला खूप मारायचा. मारहाणीमुळे खूप ब्लीडिंग झालं होतं.

राखी सावंतने बिग बॉस मराठीतून बाहेर पडल्यानंतर ती गरोदर असल्याचा खुलासा केला होता, पण आदिलला सत्य समजल्यानंतर तिचं मिसकॅरेज झालं होतं. राखीने याआधी आदिलसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

राखी आईच होऊ शकत नाही कारण तिचं गर्भाशयच काढलं आहे असा खुलासा आदिलने केला. आदिलचा हा आरोप फेटाळत राखीने थेट डॉक्टरांनाच कॅमेऱ्यासमोर आणलं आहे. राखीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या गायनोकॉलॉदिस्ट डॉ वीणा शिंदे यांना कॅमेऱ्यासमोर आणलं आहे.

व्हिडिओत राखी सांगते, "आज मी माझी आई, डॉक्टर ते म्हणतात देव सगळीकडे येऊ शकत नाही म्हणून त्याने डॉक्टरांना बनवलं. जेणेकरुन आपलं आरोग्य चांगलं राहील. काही महिन्यांपूर्वी माझं गर्भाशयाचं ऑपरेशन झालं."

"मला आदिलशी लग्न झाल्यानंतर आई व्हायचं होतं. पण माझ्या गर्भाशयात फायब्रॉइड्स होते. वेळीच मी आई झाले असते तर ही वेळ माझ्यावर आली नसती. ज्या डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं त्यांच्याकडे मी आले आहे."

डॉक्टर म्हणाल्या,"राखी आई होऊ शकते. तिच्या गर्भाशयात बरेच फायब्रॉइड्स होते. ते काढले आहेत. तिचे गर्भाशय कधीच काढलं नाही केवळ फायब्रॉइड्स काढले. तिचे एग्सही फ्रिज केले आहेत. ती नक्कीच आई होऊ शकते."

राखीने हा व्हिडीओ शेअर करत आदिलचा आरोप फेटाळून लावला आहे. तसंच तो मला बदनाम करतोय असंही ती म्हणाली आहे. मात्र हा केवळ एक आरोप आहे जो राखीने फेटाळला आहे. या व्यतिरिक्त आदिलने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत.