"माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं", Starkid असूनही श्रद्धाच्या वाट्याला आला संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 01:00 PM2024-08-16T13:00:20+5:302024-08-16T13:14:53+5:30

श्रद्धा कपूरने व्यक्त केल्या भावना, आता 'स्त्री 2' मधून गाजवतेय बॉक्सऑफिस

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या 'स्त्री 2' मधून थिएटर गाजवत आहे. २०१८ साली आलेल्या ब्लॉकबस्टर 'स्त्री' चा बहुप्रतिक्षित सीक्वेल आहे. या सिनेमात श्रद्धा पुन्हा वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.

श्रद्धा कपूर ही शक्ती कपूरची लेक आहे. स्टारकीड असूनही श्रद्धाला बॉलिवूडमध्ये आजही संघर्षच करावा लागतोय. श्रद्धा अनेकदा बॉलिवूडमध्ये गटबाजीला बळी पडली आहे. इतकंच काय तर सुरुवातीच्या काळात तिच्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं असा खुलासा तिने नुकताच केला आहे.

श्रद्धाने 2010 साली 'तीन पत्ती' सिनेमातून पदार्पण केलं होतं. हा सिनेमा सपशेल आपटला होता. तिला बऱ्याचदा नकाराचा सामना करावा लागला. बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध खलनायकाची लेक असूनही तिला काहीच फायदा झाला नाही.

नुकत्याच एका मुलाखतीत श्रद्धा म्हणाली, "एक काळ होता जेव्हा मी अनेक ऑडिशन देत होते पण रिजेक्ट होत होते. कारण दोन फ्लॉप सिनेमांनंतर माझ्यासोबत कोणीच काम करायला तयार नव्हतं." असं म्हणत श्रद्धाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

अखेर २०१३ साली तिला आशिकी 2 मिळाला आणि तिचं नशीबच पालटलं. मोहित सुरीने तिच्यावर विश्वास दाखवत तिला ही सुवर्णसंधी दिली. या सिनेमामुळे आदित्य आणि श्रद्धा रातोरात स्टार झाले.

आशिकी 2 नंतर श्रद्धाने बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं. यातले काही हिट झाले तर काही फ्लॉप. नेपोटिझमच्या वादात श्रद्धा मात्र वेगळी ठरली. स्टाररकिड असूनही तिला बॉलिवूडमध्ये कोणीच मदत केली नाही. करण जोहरनेही आलिया भटलाच पुढे आणलं. त्याने आपल्या कॉफी विथ करण शोमध्ये नंतर श्रद्धाला बोलवलं नाही.

प्रोफेशनल आयुष्यात असं सुरु असताना वैयक्तिक आयुष्यातही श्रद्धाला प्रेमात अपयशच आलं. आधी आदित्य रॉय कपूरसोबत तिचं ब्रेकअप झालं. नंतर फरहान अख्तरच्या ती प्रेमात पडली. मात्र शक्ती कपूर यांनी विरोध केला. नुकतंच श्रद्धा लेखक राहुल मोदीला डेट करत होती. मात्र आता हेही नातं तुटल्याचं समोर आलं आहे.

इतकं सगळं असतानाही श्रद्धाला सोशल मीडियावर मात्र चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळतं. तिचे इन्स्टाग्रामवर 91.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. प्रियंका चोप्रानंतर श्रद्धाचाच यामध्ये नंबर लागतो. श्रद्धा बरेचदा प्रत्येक कमेंटला रिप्लाय करताना दिसते. यामुळेच ती चाहत्यांची लाडकी आहे.