Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 01:08 PM 2024-10-18T13:08:49+5:30 2024-10-18T13:20:38+5:30
Food Tips :दिवाळी (Diwali 2024) तोंडावर आल्याने आता घरोघरी फराळाची लगबग सुरु होईल. कारण, दिवाळीत खाद्यपदार्थांची चंगळ असते. गृहिणींना आपली पाककला पणाला लावून किती फराळ करू आणि किती नको असे होऊन जाते. मात्र याच काळात बाजारात घाऊक प्रमाणात माल विक्री करण्याच्या नादात भेसळयुक्त पदार्थ बाजारात विकले जातात. गेल्या अनेक वर्षात खवा, मावा भेसळयुक्त मिळत असल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत, पण आता तर रोजच्या वापरातल्या मसाल्यांमध्येही भेसळ असल्याचे आढळून आले आहे. त्यासाठीच महत्त्वाची बाब म्हणजे नेहमीच्या दुकानातून माल खरेदी करा, स्वस्त घेण्याच्या नादात कमी गुणवत्तेचा माल खरेदी करू नका. विकत घेत असलेल्या पदार्थावर शासनाची मोहोर आहे की नाही ते तपासून बघा. विकतचा फराळ आणणार असाल तर ओळखीतल्या गृहउद्योगांना प्राधान्य आणि प्रोत्साहन द्या. स्वतः माल खरेदी करणार असाल तर पुढील पदार्थांची चाचणी करा.
जिरे : जिरे तपासण्यासाठी हातात थोडे जिरे घ्या आणि दोन्ही तळहातांमध्ये घासून घ्या. तळहाताचा रंग सुटला तर ते भेसळयुक्त आहे असे समजा! कारण खरे जिरे रंग सोडत नाही.
हिंग : हिंगाचा दर्जा तपासण्यासाठी पाण्यात विरघळवून पहा. द्रावणाचा रंग दुधाळ झाला तर हिंग खरा आहे हे समजून घ्या. दुसरा मार्ग म्हणजे हिंगाचा तुकडा जिभेवर लावा, जर हिंग खरा असेल तर तुम्हाला कडूपणा किंवा तुरटपणा जाणवेल. शिवाय हिंगाचा उग्र वास त्याच्या अस्सलतेचि ओळख आहे.
मिरची पावडर : लाल मिरची पावडरमध्ये सर्वाधिक भेसळ केली जाते. ती तपासण्यासाठी मिरची पावडर पाण्यात टाका, जर रंग पाण्यात विरघळला आणि भुसा तरंगू लागला तर मिरची पावडर बनावट आहे असे समजावे. भेसळ नसलेली मिरची पावडर पाण्यात मिसळून पाण्याला लाल रंग येईल.
बडीशेप : आजकाल अशी बडीशेप आणि कोथिंबीर बाजारात मिळते ज्यावर हिरव्या रंगाचा थर असतो. तो तपासण्यासाठी कोथिंबीरीत आयोडीन मिसळा, रंग काळा झाला तर समजून घ्या की कोथिंबीर बनावट आहे. कोथिंबीर नळाच्या पाण्याने धुवून घेतली आणि रंग निघू लागला तरी त्यातली भेसळ कळून येते. हीच बाब बडीशेपची! बडीशेप पाण्यात टाकल्यावर हलकासा पोपटी रंग येणे स्वाभाविक आहे, पण पूर्ण पाणी हिरवे होत असेल तर ती भेसळयुक्त आहे.
काळी मिरी : काळी मिरी पपईच्या दाण्यांसारखीच दिसते, त्यामुळे कधी कधी भेसळयुक्त काळी मिरीमध्ये पपईच्या बिया खपवल्या जातात. मिरी तपासण्यासाठी ती पाण्यात टाका. काळी मिरी पाण्यावर तरंगत असेल तर ती पपईची बी असेल, काळी मिरी पाण्याच्या तळाशी जाऊन बसेल आणि हाताला टणक लागेल.
मध : मधातही मोठ्या प्रमाणात भेसळ असते. मधामध्ये साखर मिसळली जाते, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी एका ग्लासमध्ये मधाचे थेंब टाका, जर मध तळाशी स्थिर झाला तर तो खरे आहे असे समजा, तरंगत राहिला तर भेसळयुक्त समजा.
तूप : तुपातील भेसळ तपासण्यासाठी दोन चमचे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि दोन चमचे साखर घेऊन त्यात एक चमचा तूप मिसळा. मिश्रण लाल झाले तर समजून घ्या की तूप भेसळ आहे.
दूध : दुधात पाणी, दूध पावडर आणि रसायनांची भेसळ केली जाते. तपासण्यासाठी, आपले बोट दुधात घाला आणि ते बाहेर काढा. जर दूध बोटाला चिकटले तर समजून घ्या की दूध शुद्ध आहे. दूध चिकटले नाही तर दुधात भेसळ आहे.
चहा पावडर : चहाची चाचणी करण्यासाठी, एक पांढरा कागद हलका भिजवा आणि त्यावर चहाचे दाणे पसरवा. कागदावर रंग आला तर समजून घ्या की चहा खोटा आहे कारण खऱ्या चहाच्या पानांचा गरम पाण्याशिवाय रंग सुटत नाही.
कॉफी : कॉफीची शुद्धता तपासण्यासाठी ती पाण्यात विरघळवा. शुद्ध कॉफी पाण्यात विरघळते, विरघळल्यानंतर कॉफी तळाशी चिकटली तर ती बनावट असते.