- माधुरी पेठकररोज खाल्लंच पाहिजे अशा यादीतला महत्त्वाचा घटक ेँम्हणजे अंजीर. सुक्यामेव्यातला हा एक मेवा. तो फक्त हिवाळ्यातच खायला हवा असं नाही. उलट वर्षभर रोजच्या आहारात अंजीर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पोटात जाणं गरजेचं आहे. एक अंजीर रोज खाल्लं तर अनेक फायद्यांची माळ आपल्या आरोग्याच्या गळ्यात पडू शकते इतकं अंजीर गुणवान आहे.भारतातल्या वाळवंटी प्रदेशात, इराण, पाकिस्तान, तुर्कस्तान इथे अंजीर मोठ्या प्रमाणात पिकतं. विशिष्ट हंगामात ओलं अंजीर खायला मिळत असलं तरी अंजीर म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते सुकं अंजीरच. अंजीर खाल्ल्यामुळे दमा कमी होतो. बध्दकोष्ठता जाते. अंजीरमध्ये पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असतं. त्याचा फायदा ह्रदयाचे ठोके नियमित होण्यास होतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहातो. तसेच वाळवलेल्या अंजीरमध्ये पेक्टिन नावाचा घटक असतो त्यामुळे रक्तातली जास्तीची साखर कमी होण्यास मदत होते. आणि शरीरास लोहाचा पुरवठा अंजीर खाल्ल्यानं मुबलक प्रमाणात होतो.अंजीरमध्ये लोह,मॅग्नेशियम, तांबं, कॅल्शिअम आणि जीवनस्त्त्वं ठासून भरलेली असल्यामुळे रोज एक अंजीर खाणं फीट राहण्यासाठी गरजेचं आहे. रक्ताची कमतरता अंजीर खाल्ल्यानं भरून निघते. रोज रात्री अंजीर पाण्यात भिजवायचं. आणि सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये ते वाटून घेवून पिल्यास जुनाट बध्दकोष्ठता दूर होते.पण रोज नुसतं सुकं अंजीर खाऊन किंवा रोज रोज पाण्यात वाटून पिण्याचाही कंटाळा येतो. नुसतं अंजीर खायचा कंटाळा आला तर अंजीर वेगवेगळ्या आणि आकर्षक स्वरूपातही खाता येतं. अंजीराची बर्फी, अंजीर हलवा, अंजीर शेक, केक, सलाड आणि चटणीच्या सोबत किंवा इतर पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी म्हणून मिक्स करूनही अंजीर खाल्लं तरी तोच फायदा शरीराला मिळणार आहे. अंजीरापासूनचे पदार्थ बनवणं अगदी सोपे,सहज असून ते चटकन होतात.अंजीराचा आरोग्याला होणारा फायदा समजून घेवून कोणत्या ना कोणत्या रूपात अंजीर खाण्याची सवय स्वत:ला लावून घेणं फायद्याची आहे. शिवाय अंजीरापासून विविध पदार्थही बनवता येतात. त्यामुळे नाश्त्याच्या आणि गोडाच्या पदार्थांमध्ये अंजीरामुळे विविधताही येते.अंजीर स्पेशल1 अंजीर बर्फी किंवा हलवासुकामेव्याची बर्फी करताना त्यात अंजीर वाटून टाकावं. अंजीरामुळे बर्फीला नैसर्गिक गोडवा येतो. तसेच बर्फीतले इतर घटक एकसंघ होण्यास अंजीरामुळे मदत होते.भिजवलेले अंजीर वाटून ते तुपात परतून केलेला अंजीर हलवा हा पौष्टिक आणि चवदार असतो हे वेगळं सांगायला नको. 2. शेक आणि ज्यूसअंजीर रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते दुधाबरोबर वाटून घ्यावेत. हा शेक गार करून प्यावा. ओले अंजीर मिळतात तेव्हा थोड्याशा पाण्याबरोबर वाटून घेवून त्याचं ज्यूसही करता येतं.3. अनेकांना सकाळी सिरिअलचा नाश्ता करण्याची सवय असते. अशा नाश्त्याची पौष्टिकता आणि चव दोन्ही वाढवायचे असेल तर अंजीरसारखा पर्याय नाही. यासाठी सिरिअलमध्ये अंजीर बारीक तुकडे करून टाकावेत.4. केक, ब्रेड, मफीन्स यामध्येही अंजीराचे तुकडे करून टाकल्यास हे पदार्थ पौष्टिक होतात. तसेच त्यांची चवही बदलते.5. सलाडमध्ये अंजीरचे बारीक तुकडे घालूनही सलाड खाता येतं. 6. अनेकांना घरी बनवलेलं जाम खायला आवडतं. आणि या आवडीपोटी अनेकांच्या घरी जाम तयार केला जातो. अंजीराचाही जाम करता येतो. इतर कोणत्याही जामपेक्षा अंजीर जाम चवीला आणि गुणालाही उत्तमच लागेल.