ब्रँडेड पिझ्झा खाण्यासाठी चांगलेच पैसे मोजत असाल पण हा पिझ्झा मुळात होता गरिबांचा... By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 07:15 PM 2021-12-08T19:15:52+5:30 2021-12-08T19:39:22+5:30
पिझ्झा सर्वांना आवडतो. पिझ्झाचे अनेक प्रकार तुम्ही मिटक्या मारत खातच असाल. पण श्रीमंतांच खाणं समजला जाणारा हा पिझ्झा मुळात गरिबांच्या घरात तयार व्हायचा. काय आहे यामागची गोष्ट वाचा पुढे... इसपूर्व ६००च्या आसपास नेपल्स हे समुद्र किनार्यावरचे एक भरभराटीला आलेले संस्थानच होते. इथे बंदर असल्याने काहीतरी काम मिळेल या आशेने अनेक गरीब लोक नेपल्सला येऊन रहात. नेपल्स अशा गरीब, बेघर लोकांचे गाव म्हणूनच प्रसिद्ध होते. या लोकांना पटपट खाणे संपवून कामावर जाता येईल अशा स्वस्त आणि मस्त अन्नाची गरज असे. गरज ही शोधाची जननी या न्यायाने तिथे अनेक फेरीवाले, छोटे हॉटेलवाले चपट्या ब्रेडवर निरनिराळे पदार्थ घालून त्याला चविष्ट बनवून विकत असत. या कळकट हाटीलात खाल्ल्या जाणार्या गरीबांच्या या पदार्थाची त्या काळात कुचेष्टाच होत असे.
कालांतराने कोलंबसाच्या अमेरीकावारीमुळे इटलीत टोमॅटो खर्या अर्थाने प्रवेशला. उच्चभ्रू लोकांनी त्याला विषारी फळ म्हणून नाकारले तरी गरीबांना मात्र ते फार आवडले. त्यामुळे पिझ्झा ब्रेडवर टोमॅटोचा सढळ हस्ते वापर होऊ लागला. एव्हाना टोमॅटो, चीज, ऑलिव्ह ऑइल आणि अॅन्चोवीज यांची पखरण असणारा पिझ्झा नेपल्समधला प्रसिद्ध खाद्य पदार्थ झाला होता.
१८६१मध्ये इटलीचे एकत्रीकरण झाले. नेपल्स आता इटली देशाचा एक भाग झाले. १८८९ मध्ये त्यावेळचा इटलीचा राजा उम्बर्टो आणि राणी मार्गारिटा, इटली भ्रमण करता करता नेपल्सला आले. आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यावेळची डेलिकसी असणारे फ्रेंच खाद्यपदार्थ खाऊन कंटाळलेल्या राणीने पिझ्झा खाऊन बघायचे ठरवले. आले राणीच्या मना तेथे कोणाचे चालेना! मग त्यावेळचा प्रसिद्ध पिझ्झानिर्माता एस्पोसितोला राणीसाठी पिझ्झाचे निरनिराळे प्रकार बनवायची ऑर्डर दिली गेली. त्या सर्वातला राणीला भावला तो इटलीच्या राष्ट्रध्वजाचे रंग असणारा पिझ्झा. यात लाल टोमॅटो, पांढरे चीज आणि बेसिलची पानं वापरली होती. राणीला आवडलेला पिझ्झा म्हणून या पिझ्झाला पिझ्झा मार्गारिटा हेच नाव पडले!
अशा रीतीने राणीचा आशिर्वाद मिळाल्याने पिझ्झा की तो चल पडी! इटलीच्या निरनिराळ्या भागात तिथल्या वैशिष्ट्यानुसार पिझ्झा बनायला लागले.अजूनही तिथल्या स्थानिक वैशिष्ट्यासह बनतात. पिझ्झा मरिनारा हा एक लोकप्रिय पिझ्झाचा प्रकार. हाही नेपल्सचाच एक पारंपारिक पिझ्झा. याचे नाव मरिनारा पडायचे पण एक कारण आहे. हा पिझ्झा खलाशांच्या बायका, त्यांचे नवरे मासेमारी करून दमून घरी आले की त्यांच्यासाठी बनवायच्या! यात ओरिगॅनो, अॅन्चोवीज आणि लसूण वापरलेला असतो.
या बहूढंगी पदार्थाची ख्याती महायुद्धापर्यंत तरी इटलीपुरतीच मर्यादित होती. मात्र महायुद्धाच्या आसपास आणि नंतर इटालियन लोक मोठ्या प्रमाणात अमेरीकेत स्थलांतरित होऊ लागले. गरीब नेपल्सवासियांना अमेरीकेतल्या कारखान्यांमध्ये नोकर्या मिळू लागल्या. स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना आपल्या लाडक्या खमंग पिझ्झाची आठ्वण येऊ लागली. मग हळूहळू तिथेच बिनापरवाना पिझ्झेरिया सुरू होउ लागले! मॅनहॅटनमध्ये १९०५साली लोम्बार्डीजचा पहिला अधिकृत पिझ्झेरिया सुरू झाला. मात्र अमेरिकन लोक पिझ्झाला फास्ट फूड म्हणूनच बघायला लागले आणि पिझ्झा मध्ये खास अमेरीकन बदल होऊ लागले. फक्त ऑलिव्ह, चीज, टोमॅटो असणार्या पिझ्झावर चिकन, अंडी, सलामी ते स्मोक्ड सामन अशी टॉपिन्ग्ज येऊ लागली. पिझ्झाने अमेरीकेला वेड लावले. इतके की पिझ्झा हा इटलीतला पदार्थ हे विसरून अमेरिकनच झाला!