CoronaVirus : लॉकडाऊन नियमांचं केलं उल्लंघन, मिळालं मॅचच तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 04:31 PM2020-04-11T16:31:17+5:302020-04-11T17:24:38+5:30

जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेसह जगभरात १६ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर एक लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. तसेच, सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत आहे.

यातच यूनानमधील फूटबॉल क्लब एईके एथेंसचा एक चाहता देशातील लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर पडला. लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील प्रशासनाने त्याचावर कारवाई केली आणि त्याला दंड भरावा लागला.

जवळपास ६० वर्षीय हा चाहता एथेंसच्या उपनगरातील निया फिलाडेलफियाजवळ टीमचे नवीन स्टेडियम बांधकाम पाहण्यासाठी जात होता.

लॉकडाऊन दरम्यान या चाहत्याजवळ घराबाहेर जाण्यासाठी लागणारा पास नव्हता. त्यामुळे त्याला १५० रुपयांचा दंड भरावा लागला.

एथेंस टीमचे मालक दिमत्रिस मेलिस्सानिदिस यांना या चाहत्यासंदर्भात समजले. त्यानंतर त्यांनी चाहत्याला दंडाची रक्कम देण्यासोबत पुढील सामन्याचे तिकीट देण्याचे निर्देश क्लबला दिले आहेत.

टीमकडून जारी करण्यात आलेल्या संदेशात म्हटले आहे की, 'आम्ही घरात आहोत, निरोगी आहोत. ज्यावेळी आम्ही या स्थितीतून बाहेर येऊ, त्यावेळी आमचे नवीन स्टेडियम आमची वाट पाहत असेल.'

दरम्यान, यूनानमध्ये अनेक लोकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली असून जवळपास ९० लोकांचा मृत्यू झाला आहे.