कोरोनाकाळात लागलं ऑनलाईन राहण्याचं व्यसन; मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम, अशी घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 10:27 AM 2021-08-28T10:27:14+5:30 2021-08-28T11:25:20+5:30
Addiction to social media : कोरोनामुळे लागलेली टाळेबंदी आणि त्यामुळे हिंडण्याफिरण्यावर आलेले निर्बंध या सगळ्याला त्रासलेल्या लोकांनी मोबाईलमधील विविध ॲप्सना जवळ केले. देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे लागलेली टाळेबंदी आणि त्यामुळे हिंडण्याफिरण्यावर आलेले निर्बंध या सगळ्याला त्रासलेल्या लोकांनी मोबाईलमधील विविध ॲप्सना जवळ केले.
मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. ओटीटी प्लॅटफॉर्मही त्यामुळे फॉर्मात आले. मात्र, यातून सतत ऑनलाईन राहण्याचे व्यसन हे अधिकाधिक लोकांना लागले आहे. नुकतेच झालेल्या एका सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे.
काय सांगतं सर्वेक्षण नॉर्टन या सायबर सुरक्षा संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात लोकांना कोरोनाकाळात मोबाईलचे अधिक व्यसन लागल्याचे स्पष्ट झाले. ७४ टक्के लोकांनी आपल्याला हे व्यसन लागल्याची कबुली देतानाच त्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचेही सांगितले.
५५ टक्के लोकांनी अतिमोबाईल पाहिल्याने त्याचा मनावर परिणाम होत असल्याची कबुली दिली आहे. तर ४० टक्के लोकांनी आपल्याला अद्याप स्मार्ट होम उपकरणांची संपूर्ण माहिती नसल्याचं सांगितलं आहे.
३५ टक्क्यांनी स्मार्ट होम उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्या ग्राहकांचा डेटा वापरत असल्याने स्मार्ट टीव्ही घेण्याचे टाळत असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये मोबाईलच्या व्यसनामुळे झोपेचे खोबरे होत असल्याची कबुलीही बहुतेकांनी दिली आहे.
मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम मोबाईलच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहेत. प्रामुख्याने झोप न येणे, डोळे सतत लाल राहणे, डोळे कोरडे पडणे, अंधुक दिसणे, विस्मरणाचे प्रमाण वाढणे, नैराश्य येणे आणि स्थूल होणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
लॅपटॉप, मोबाईल वा इतर गॅजेट्स वापरताना ही काळजी घ्या... सध्या अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे घरी काम करताना देखील लॅपटॉपची स्क्रीन आणि डोळे यांच्यात किमान २६ इंचाचे अंतर ठेवा. मोबाईल स्क्रीन आणि डोळे यांच्यात १४ इंचाचे अंतर असायला हवे.
सतत लॅपटॉपवर काम केल्याने अथवा मोबाईलचा वापर केल्याने डोळ्यावर थोडा ताण येतो. दिवसातून चार ते पाच वेळा डोळ्यांवर थंड पाण्याचा शिपका मारा. गरज नसल्यास उगाच मोबाईल हातात धरू नये.
कोरोनाकाळात ऑनलाईन राहण्याचे व्यसन लागल्याने लोक सतत सोशल मीडियावर सक्रिय असतात. याच नादात आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं. गेम खेळताना. चॅटिंग करताना फास्ट फूड खाण्याकडे अधिक कल असतो.
सध्याच्या दैनंदिन जीवनात आहाराला विशेष महत्त्व द्या. आपल्या आहारात पौष्टिक घटकांचा समावेश करा. प्रामुख्याने पालेभाज्या, सुकामेवा, फळे याकडे जास्त भर द्या. यामुळे मानसिक आणि शारीरीक आरोग्य उत्तम राहिल.