CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...! By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 07:04 PM 2021-04-16T19:04:43+5:30 2021-04-16T19:36:34+5:30
अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा सारख्या देशांतील 6 तज्ज्ञांचा दावा, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनंही केली रिसर्चची समीक्षा...! (CoronaVirus is predominantly transmitted through air ) कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या महामारीमुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोट्यवधी लोक संक्रमित झाले आहेत. यातच मेडिकल जर्नल Lancet ने कोरोना व्हायरससंदर्भात धक्कादायक दावा केला आहे. हा घातक व्हायरस प्रामुख्याने हवेतून परसतो आणि याचे ठोस पुरावेही आहेत, असे लॅन्सेटने म्हटले आहे. (America CoronaVirus is predominantly transmitted through air says lancet study on coronavirus)
अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा सारख्या देशांतील 6 तज्ज्ञांनी दावा केला आहे, की हा व्हायरस हवेतून पसरत असल्यानेच मोठ्या प्रमाणावर सावधगिरी बाळगूनही आणि उत्तम प्रकारची आरोग्य सुविधा असतानाही त्याचा वेगाने प्रसार होत आहे.
तज्ज्ञांच्या या टीममध्ये CIRES (Cooperative Institute for Research in Environmental Sciences)चे केमिस्ट जोस लुइस जिमेनेज यांचेही नाव आहे. तज्ज्ञांनी म्हटले आहे, की त्यांना कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत आणि ही गोष्ट नाकारली जाऊ शकत नाही.
विशेष म्हणजे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमनेही या रिसर्चची समीक्षा केली आहे आणि कोरोना व्हायरस हवेतून पसरत असल्याच्या दाव्याला हायलाइट केले आहे.
महत्वाचे म्हणजे, केवळ मोठ्या ड्रॉपलेट्सपासूनच कोरोना पसरतो, याचे कुठलेही पुरावे नाहीत. हा व्हायरस हवेतून वेगाने पसरतो, हे सिद्ध झाले आहे, असेही या अभ्यासात म्हणण्यात आले आहे.
या अभ्यासात तज्ज्ञांनी म्हटले आहे, की WHO आणि इतर संघटनांना हे गांभीर्याने घेत, व्हायरसचा प्रसार कमी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
जानकारांनी आपल्या लिस्टमध्ये स्कॅगिट चॉयर आउटब्रेकला टॉपवर ठेवले आहे. येथे केवळ एका संक्रमित व्यक्तीपासून एकूण 53 लोक संक्रमित झाले होते.
अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की या केसमध्ये असेही झाले नाही, की सर्व लोक एकाच ठिकाणी गेले अथवा क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आले. मात्र, तरीही कोरोना पसरला. एवढेच नाही, तर कोरोनाचा प्रसार इनडोअरच्या तुलनेत आउट डोअर अधिक दिसून आला आहे.
‘संपूर्ण जगात प्रामुख्याने हवेतून पसरला कोरोना’ - Lancet च्या अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की 40 टक्के लोकांमध्ये, अशा लोकांपासून कोरोना पसरला, जे खोकलत अथवा शिंकतही नाहीत. संपूर्ण जगात कोरोना पसरण्याचे मुख्य कारण हेच आहे. कारण हा व्हायरस प्रामुख्याने हवेच्या माध्यमाने परसला.
महत्वाचे म्हणजे, हवेतून व्हायरस पसरत असल्याचे लक्षात घेत बचावासाठी रणनीती तयार करण्याची आवश्यकता आहे, असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.