Benefits of onion-garlic peels: कांदा-लसणीची सालं फेकू नका, वाचा त्यांचे सहा आश्चर्यकारक फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:03 AM 2022-07-14T07:03:00+5:30 2022-07-14T07:05:01+5:30
Benefits of onion-garlic peels: लसूण आणि कांद्याच्या सालीचे फायदे अनेकांना माहित नाहीत. आपण ते कचरा म्हणून फेकून देतो. पण कांदा लसूण जितका आरोग्यदायी तेवढीच त्यांची सालं सुद्धा भरपूर फायदे देणारी आहेत. त्याबद्दल आज माहिती करून घेऊया. कोवळी दुधी, दोडकी यांच्या सालींची चटणी, लाल भोपळ्याच्या सालीची चटणी, टरबूजाच्या सालांची भाजी, टुटी फ्रुटी अशा अनेक भाज्या व फळांच्या सालांचे उपयोग तुम्ही केले असतील. परंतु रोजच्या वापरातला कांदा लसूण सोलून झाल्यावर त्याच्या सालांना आपण सरळ केराची टोपली दाखवतो. परंतु तसे न करता त्याचे फायदे जाणून घेतले तर तुम्ही थक्क व्हाल आणि इतकी वर्षं आपण त्यांचा वापर का केला नाही याबद्दल आश्चर्यदेखील व्यक्त कराल! चला जाणून घेऊ त्याचे फायदे...
चहा: कांदा आणि लसणीच्या सालीचा वापर चहासाठी करता येतो. गरम पाण्यात ही सालं उकळून त्याचा अर्क असलेले पाणी ग्रीन टी सारखे पिता येते. हा चहा चवीला उग्र लागेल परंतु तो आरोग्यासाठी चांगला असेल. फक्त लक्षात ठेवा की सालं धुऊन स्वच्छ पुसून मगच वापरा आणि जर ते सेंद्रिय असतील तर आणखी चांगले.
रोपांसाठी: कांदा आणि लसणीच्या सालांचा रोपांसाठी खत म्हणून वापर करता येतो. त्यासाठी ती सालं रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सालं काढून ते पाणी रोपांना टाका. रोपांची वेगाने वाढ होईल. कारण त्या पाण्यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम इ गुणधर्म असतात.
केस रंगविण्यासाठी केसांना सोनेरी तपकिरी रंग देण्यासाठी कांद्याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कांद्याची साले अर्धा तास उकळत ठेवा. आता या तयार कांद्याच्या पाण्याने स्वच्छ केसांना मसाज करा आणि अर्ध्या तासानंतर डोके धुवा. हे नैसर्गिक केसांच्या रंगासारखे कार्य करते.
त्वचेच्या खाजेवर त्वचेवरील खाज दूर करण्यासाठीही या सालींचा वापर केला जाऊ शकतो. कांदा किंवा लसणीची साले पाण्यात बुडवून नंतर ते पाणी त्वचेवर लावा. खाज शमेल आणि लवकर आराम पडेल.
स्नायूंच्या तक्रारी: जर तुम्हाला स्नायू आखडल्यासारखे वाटत असतील, क्रॅम्प्स जाणवत असतील तर कांद्याची साले पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवल्यानंतर ते चाळून घ्या. झोपण्यापूर्वी हे पाणी चहासारखे प्या. त्यामुळे स्नायूंच्या तक्रारी दूर होतील.