काळी बुरशी घातक! मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोका; काय आहेत या आजाराची लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 08:45 IST2025-02-27T08:42:04+5:302025-02-27T08:45:45+5:30

बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला 'म्युकरमायकोसिस' म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते. ती मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोकादेखील संभवतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

म्युकरमायकोसिस हा संसर्ग कोणत्याही वयोगटातील कोणालाही होऊ शकतो. बहुतेक लोक त्यांच्या जीवनात कधीतरी म्युकर बीजाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. परंतु बहुतांशवेळा या बुरशीजन्य संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींवर गंभीर परिणाम होतो.

अनियंत्रित मधुमेह, न्यूट्रोपेनिया, अवयव प्रत्यारोपण, मूत्रपिंड अपुरेपणा आणि एचआयव्ही या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना अधिक धोका असतो.

कोरोना काळात रुग्णांमध्ये काळी बुरशी आढळून आली कारण या काळात झालेल्या उपचारांमध्ये स्टिरॉइड्सचा मोठ्चा प्रमाणावर वापर झाला होता. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली होती.

बुरशीचा प्रकार - वातावरणातील बुरशीजन्य कणांच्या संपर्कात आल्याने लोकांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग होऊ शकतो. शरीरावर कापण्यामुळे, खरचटण्यामुळे, भाजण्यामुळे झालेल्या जखमेतून किंवा इतर प्रकारच्या त्वचारोगांमुळे झालेल्या जखमेतून या बुरशीचा शिरकाव झाल्यामुळेही हा संसर्ग होऊ शकतो.

संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका - विविध आजारांचे उपचार किंवा औषधे सुरू असणाऱ्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक थोका असतो

चेहरा आणि नाकावर काळे डाग - या संसर्गामुळे चेहरा आणि नाकावर काळे डाग पडतात. त्वचेचा रंग बदलतो. दृष्टी अधू होते, छातीत दुखू लागणे, श्वास घ्यायला त्रास आणि खोकल्यातून रक्त पडणे इत्यादी लक्षणे जाणवतात

लक्षणे काय? - डोळे किंवा नाकाभोवती लालसरपणा आणि वेदना, डोकेदुखी, खोकला, ताप, बदललेले मानसिक आरोग्य

मेंदूपर्यंत जातो हा आजार - नासिकेच्या आतल्या हाडात, नाक, दात आणि त्यानंतर डोळ्यांकडे पसरतो. नंतर संसर्ग फुप्फुसे आणि मेंदूपर्यंतही पसरू शकतो.