रक्तदान करून दुसऱ्यांचा जीव वाचवा अन् ब्लड कॅन्सरही टाळा; जाणून घ्या किती आहेत फायदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 20:17 IST2025-03-18T20:13:12+5:302025-03-18T20:17:05+5:30

Blood Donation Benefits: तुमच्या अवती भोवती, मित्रांपैकी किंवा नातेवाईकांपैकी अनेकजण नियमितपणे रक्तदान करत असतील. आणि त्यामुळे रक्तदान करून काय होतंय, असा प्रश्न तुम्हालाही पडत असेलच... मग समजून घ्या रक्तदान करण्याचे फायदे.

रक्तदान हे दुसऱ्याचा जीव वाचवणारे कार्य मानले जाते. त्यामुळे रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले जाते. मात्र, हे केवळ श्रेष्ठ दान नाही तर रोग्यासाठीदेखील ते लाभदायक ठरत असल्याचा दावा लंडनमधील फ्रान्सिस क्रिक संस्थेतील एका संशोधनात केला आहे.

वारंवार रक्तदान करणाऱ्यांमध्ये सूक्ष्म आनुवंशिक बदल होऊ शकतो. त्यामुळे ब्लड कॅन्सरचा धोका कमी होण्याची शक्यतादेखील जास्त आहे. यासोबत नियमित रक्तदान केल्याने आरोग्याला विविध फायदे होत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

जसजसे वय वाढते तसे आपल्या रक्त तयार करणाऱ्या स्टेम पेशींमध्ये म्युटेशन नैसर्गिकरीत्या घडते.

यांपैकी काही म्युटेशन ल्युकेमियासारख्या आजाराचा धोका वाढवतात. मात्र, या नवीन संशोधनात वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांमध्ये आरोग्यासाठी लाभदायक असे काही फरक आढळून आले आहेत.

एका गटातील पुरुषांनी वयाच्या ४० वर्षांपर्यंत वर्षाकाठी तीन वेळा रक्तदान केले होते; तर दुसऱ्या गटाने त्यांच्या आयुष्यात केवळ पाचवेळा रक्तदान केले होते.

या दोन्ही गटांत आनुवंशिक म्युटेशनची संख्या समान असली तरी त्यांच्या प्रकृतीत फरक आढळला. वारंवार रक्तदान करणाऱ्या गटातील जवळपास ५० टक्के लोकांमध्ये म्युटेशनचा एक विशिष्ट वर्ग तयार झाला होता, तो सामान्यतः कर्करोगाशी संबंधित नसल्याचे यातून स्पष्ट झाले.

नियमित रक्तदानामुळे ताज्या रक्तपेशी तयार होण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामुळे स्टेम पेशींच्या आनुवंशिक परिदृश्यात फायदेशीर बदल होण्याची शक्यता असते.